अशी असेल वातानुकूलित लोकल..

मुंबईकरांसाठी बहुप्रतीक्षित वातानुकूलित लोकलचे आगमन अखेर मंगळवारी मध्यरात्री कुर्ला कारशेडमध्ये झाले. या लोकलमध्ये विद्युत यंत्रणा बसवण्याचे काम होणार असून १६ एप्रिलपासून या लोकलच्या चाचण्या सुरू होण्याची शक्यता आहे. खिडक्यांची मोठमोठी तावदाने, आरामदायक आसनव्यवस्था, स्वयंचलित दरवाजे आदी वैशिष्टय़ांसह सुसज्ज अशी ही गाडी मुंबईकरांच्या नक्कीच पसंतीला उतरेल.

अंतर्गत रचना

  • या गाडीचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे वातानुकूलन प्रणाली. १२ डब्यांच्या या गाडीच्या प्रत्येक डब्यात १५ टन क्षमतेची दोन वातानुकूलित यंत्रे बसवण्यात आली आहेत.
  • खिडक्यांची मोठी तावदाने हेदेखील या गाडीचे दखल घेण्याजोगे वैशिष्टय़ आहे. नेहमीच्या लोकल गाडय़ांमध्ये दोन दरवाजांमध्ये चार खिडक्यांची रचना असते. मात्र या नव्या गाडीत दोन दरवाजांमध्ये एकच मोठी खिडकी बसवण्यात आली आहे. त्यामुळे गाडीत भरपूर उजेड येतो आणि आतील प्रवाशांना बाहेरचा परिसर बघता येईल. पावसाळ्यात पाण्याचा एक थेंबही आत येणार नाही.
  • आसने कमी असल्याने दोन आसनांमधील जागा जास्त आहे. त्यामुळे उभ्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही आरामदायक प्रवास करता येईल.
  • १२ डब्यांच्या या गाडीतील सहा-सहा डबे एकमेकांशी जोडलेले. लांब पल्ल्याच्या गाडय़ांप्रमाणे दुसऱ्या डब्यात जाण्यासाठी दोन डब्यांमध्ये जागा असेल.
  • एमयूटीपी- २ या योजनेंतर्गत सुरुवातीला आलेल्या बंबार्डिअर गाडय़ांमध्ये हँडल्सची रचना भिन्न होती. तशीच दोन तोंडे असलेली हँडल्स नव्या वातानुकूलित गाडीत बसवण्यात आली आहेत.
  • गार्ड तसेच मोटरमनच्या केबिनमध्येही वातानुकूलन व्यवस्था असल्याने त्यांचे कामही सुखद.  वातानुकूलन यंत्रणेत बिघाड झाल्यास पंख्यांचीही सोय.

आसनक्षमता

सध्या धावत असलेल्या सिमेन्स तसेच बंबार्डिअर गाडय़ांच्या तुलनेत या गाडीची आसनक्षमता कमी आहे. सिमेन्स किंवा बंबार्डिअर या गाडय़ांमध्ये ११७५ प्रवासी बसू शकतात, तर ४९८४ प्रवासी उभ्याने प्रवास करू शकतात. वातानुकूलित लोकल गाडीमध्ये १०२८ प्रवासी बसून आणि ४९३६ प्रवासी उभ्याने असे एकूण ५९६४ प्रवासी एका फेरीत प्रवास करू शकतात.

तंत्रज्ञान

गाडी संपूर्णपणे भारतीय बनावटीची असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रम डोळ्यासमोर ठेवूनच या गाडीची निर्मिती करण्यात आली आहे. या गाडीची बांधणी चेन्नईच्या इंटिग्रेटेड कोचिंग फॅक्टरीत झाली आहे. तर या गाडीतील विद्युत यंत्रणा संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या बीएचईएल कंपनीची आहे. या मेक इन इंडियामुळे गाडी तयार करण्यात प्रचंड बचत झाली असल्याचे सांगितले जात आहे. या गाडीची किंमत ५४ कोटी रुपये असून खासगी स्तरावर ही गाडी बांधली असती, तर तिची किंमत १२० कोटी रुपयांच्या आसपास होती. संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या या गाडीला अबकारी शुल्कातही सवलत देण्यात आली आहे.

फोटो गॅलरी: एसी लोकल

सुरक्षेसाठी काय काय..

  • गाडी वातानुकूलित असल्याने स्वयंचलित दरवाजे हे या गाडीचे वैशिष्टय़ आहे. या गाडीचे दरवाजे स्वयंचलित असून त्याचा ताबा मोटरमन किंवा गार्डकडे असेल.
  • आणीबाणीच्या परिस्थितीत गाडीचे दरवाजे उघडण्यासाठी दरवाजाच्या वरच्या बाजूला एक कळ देण्यात आली आहे. ही कळ फिरवून दरवाजे उघडता येतील.
  • आणीबाणीच्या परिस्थितीत गाडीतील प्रवाशांना मोटरमन किंवा गार्ड यांच्याशी संपर्क साधता यावा, यासाठी टॉक-बॅक हे वैशिष्टय़ गाडीत देण्यात आले आहे.

कमतरता काय?

  • गाडीच्या डब्यांमध्ये उभ्या असलेल्या प्रवाशांसाठी असलेली हँडल्स नेहमीच्या हँडल्ससारखीच असायला हवीत.
  • अद्याप गाडीच्या डब्यांचे महिला, अपंग, साधारण अशा कोणत्याही श्रेणीत विभाजन झालेले नाही. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते हे विभाजन करणे कठीण नाही. मात्र गाडीचे सहा-सहा डबे एकमेकांशी आतून जोडले असल्याने हे विभाजन कसे करणार, असा प्रश्न आहे.
  • महिलांना चढण्या-उतरण्यासाठी स्वतंत्र दरवाजे हवेत, अशी मागणी प्रवासी संघटनेच्या महिला प्रतिनिधी करीत आहेत.