पालिकेकडून वृक्षारोपणास सुरुवात;  १०० भूखंडांवर शहरी जंगल

मुंबई शहरातील हिरवाई वाढवण्यासाठी मुंबई महापालिकेने १०० भूखंडावर जपानी मियावाकी पद्धतीने शहरी जंगल तयार करण्याचे ठरवले असून त्यापैकी पहिले वरळी येथील नारायण पुजारी मार्गावरील एका मोकळ्या मैदानावर साकारले जाणार आहे. याशिवाय वरळीतील आणखी सहा भूखंडांवर हे उद्यान उभारण्यात येणार आहे.

वरळीतील पुजारी मार्गावरील मैदानावर देशी रोपटय़ांची लागवड करण्यास सुरुवात झाली. या मोकळ्या भूखंडावर ३६०० चौ. फूट जागेवर ४२ भारतीय प्रजातींची औषधी व इतर एकूण २२०० झाडे मियावाकी या विशिष्ट पद्धतीने लावण्यात येणार आहेत. वरळीतील पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी किल्ला, श्रीराम मिलजवळ, शंकरराव नरम पथ, गोखले रोड दक्षिण या ठिकाणच्या भूखंडावरही मियावाकी जंगल उभारण्यात येणार असल्याची माहिती साहाय्यक आयुक्त देवेंद्र जैन यांनी दिली.

गेल्या काही वर्षांत मुंबईत मोठय़ा प्रमाणावर विकासकामे झाल्यामुळे हिरवाई नष्ट होत चालली आहे. त्यामुळे पक्ष्यांचीही संख्या कमी होत गेली आहे. पर्यावरणाचा हा ढासळलेला समतोल राखण्यासाठी पालिकेने मुंबईत शहरी जंगले उभारण्याचे ठरवले आहे व त्याकरिता १०० जागांची निवड करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात बुधवारी १४ ऑगस्टपासून वरळी येथे झाली. जपानी मियावाकी तंत्राचा वापर करून हे जंगल निर्माण केले जाणार आहे. या पद्धतीमुळे दोन-तीन वर्षांतच झाडे १० ते १२ फूट वेगाने वाढतात, असे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे. झाडांचे बीज ३ किमी परिसरात पक्ष्यांच्या विष्ठेतून व हवेतून पसरून त्या ठिकाणीसुद्धा या दुर्मीळ जातीचे बी रुजून वृक्षात रूपांतर होतील व मुंबईत दुर्मीळ झाडांची संख्या वाढण्यास तर मदत होऊ  शकेल असे या पद्धतीचे फायदे आहेत.  गेल्या काही वर्षांत देशी झाडे लावण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्या झाडांवर जगणाऱ्या पक्ष्यांची संख्याही कमी झाली आहे. मियावाकी प्रकल्पांतर्गत देशी झाडे लावण्यावर भर दिला जाणार आहे. वरळी येथे गेल्या महिनाभरापासून त्याची तयारी सुरू करण्यात आली. जमीन भुसभुशीत करणे, त्यात खत घालणे अशी प्राथमिक कामे करण्यात आल्याची माहिती नगरसेविका स्नेहल आंबेकर यांनी दिली. वरळी परिसरात आणखी काही जागांची निवड करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पालघरमधून रोपे

* वरळीतील या प्रकल्पासाठी प्रशासनाने पालघर येथून विविध देशी झाडांची रोपटी आणली आहेत. वड, पिंपळ, बांबू, रिठा, चिंच, जांभूळ, बदाम यांची रोपटी लावण्यात येणार आहेत.

* मियावाकी पद्धतीत एक चौरस मीटरमध्येच तीन ते पाच रोपटी लावली जातात.  या पद्धतीत केवळ तीन वर्षांत १०-१२ फुटांहून जास्त उंच वाढते.

* झाड उंच वाढल्यामुळे त्यांची मुळेही खोलवर पसरत जातात आणि पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होते. त्यामुळे त्यांची फार काळजी घ्यावी लागत नाही.