मुंबई : गेल्या वर्षी वन विभागाकडून ऐरोलीमध्ये उभारण्यात आलेल्या ‘किनारा आणि सागरी जैवविविधता केंद्रा’च्या आवारात आता राज्यातील पहिले सागरी जीवांचे संग्रहालय उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या सागरी परिक्षेत्रात आढळणाऱ्या समुद्री जीवांच्या अवशेषांचे प्रदर्शन या संग्रहालयामध्ये करण्यात येणार आहे. संशोधन आणि प्रदर्शन अशा उद्देशाने या संग्रहालयाची निर्मिती करण्याचे वन विभागाच्या कांदळवन संरक्षण कक्षाने ठरविले आहे. त्यामुळे फ्लेमिंगो दर्शनासाठी ऐरोलीच्या केंद्रात धाव घेणाऱ्या पर्यटकांना येत्या काही वर्षांत सागरी जीवांचेही दर्शन घडणार आहे.

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील खारफुटींच्या संरक्षणासाठी वन विभागाकडून कांदळवन संरक्षण कक्षाची निर्मिती झाली. त्यानंतर कक्षाने खारफुटी संरक्षणाबरोबरच सागरी जीवांच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. राज्याच्या किनारपट्टीवर जखमी किंवा मृतावस्थेत वाहून येणाऱ्या सागरी जीवांच्या संवर्धनाचे काम कांदवळन संरक्षण विभागाकडून करण्यात येते. गेल्या काही वर्षांमध्ये किनाऱ्यावर मृतावस्थेत वाहून येणाऱ्या सागरी जीवांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामध्ये समुद्री कासवांपासून महाकाय देवमाशाचाही समावेश आहे. अशा पद्धतीने मृतावस्थेत वाहून आलेल्या जीवांना त्या-त्या किनारपट्टीवर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून पुरण्यात येते. काही दिवासांपूर्वी उरणाच्या केगाव समुद्रकिनाऱ्यावर मृताअवस्थेत ४३ फूटी महाकाय ब्ल्यू व्हेल मासा वाहून आला होता. त्यानंतर कांदळवन कक्षाकडून तीन दिवसांची विशेष मोहिम राबवून या सांगाडय़ाला ऐरोलीच्या केंद्रात आणण्यात आले.

या मोहिमेच्या पाश्र्वभूमीवर राज्याच्या विविध किनाऱ्यांवर पुरण्यात आलेल्या सागरी जीवांच्या अवशेषांना बाहेर  काढून त्यांना एकाच ठिकाणी प्रदर्शित करण्याचा विचार कांदळवन संरक्षण कक्ष करीत आहे. यासाठी ऐरोली केंद्राच्या आवारामध्ये ‘जायन्ट ऑफ दी सी ’ या संकल्पनेवर आधारित सागरी जीवांचे संग्रहालय उभारण्यात येणार आहे. सध्या या केंद्रामधून फ्लेमिंगो सफारीचे आयोजन करण्यात येते. शिवाय खारफुटी आणि त्यामध्ये वास्तव्य करणाऱ्या जीवांच्या परिसंस्थेची माहितीही या ठिकाणी मिळते. सागरी जीवांच्या  संग्रहालयाचा आराखडा तयार झाला असून अंतिम मंजूरीसाठी तो वरिष्ठांकडे पाठविण्यात आल्याची माहिती कांदळवन संरक्षण विभागाचे सहाय्यक उपवनसंरक्षक मकरंद घोडके यांनी दिली.

पुरलेले सांगाडे बाहेर काढणार

जूहू किनाऱ्यावर २०१६ साली पुरण्यात आलेला ब्राईडचा देवमासा, सिंधुदूर्ग किनाऱ्यावर पुरलेला स्प्रम व्हेल, उरणमधून आणण्यात आलेला ब्ल्यू व्हेलचा सांगाडा, वर्सोवा-वसई-पालघर आणि ऐरोली केंद्रामध्ये पुरण्यात आलेले डॉल्फिन आणि समुद्री कासावांच्या सांगडय़ांना बाहेर काढून संग्रहालयामध्ये प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे घोडके यांनी सांगितले. अशा प्रकारचे महाराष्ट्रातील हे पहिलेच संग्रहालय असून पर्यटकांबरोबरीनेच सागरी जीवांवर संशोधन करणाऱ्या संशोधकांसाठी हे संग्रहालय भविष्यात फायदेशीर ठरणार असल्याचे, घोडके म्हणाले.