रस्ते घोटाळ्यात आरोपी असलेला रेलकॉन इन्फ्रा प्रोजेक्ट्सचा संचालक कंत्राटदार दिपेन शहा याला मुंबई पोलिसांनी बुधवारी सकाळी अटक केली. पोलिसांनी वारंवार चौकशीसाठी बोलावूनही शाह चौकशीसाठी हजर झाला नव्हता. घोटाळ्याचा गुन्हा दाखल झालेल्या सहापैकी शाह हा बडा कंत्राटदार असून त्याच्या कंपनीकडे १४ रस्त्यांच्या बांधकामाचे कंत्राट होते. न्यायालयाने त्याची रवानगी १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत केली आहे.

शहरातील ३४ रस्त्यांचे निकृष्ट काम केल्याने पालिका आयुक्तांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांचे विशेष तपास पथक गुन्ह्य़ाचा तपास करत आहेत. आतापर्यंत या पथकाने कंत्राटदारांकडे काम करणाऱ्या २२ अभियंत्यांना अटक केली असून पालिकेच्या दोन मुख्य अभियंत्यांना अटक केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल असलेल्या सहा कंत्राटदारांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. मात्र, एकाही कंत्राटदाराने हजेरी लावली नाही.

आणखी पालिका कर्मचाऱ्यांना अटक?

२२ अभियंते आणि एक कंत्राटदाराला अटक झाली असताना दुसरीकडे पालिकेच्या दोन मुख्य अभियंत्यांना पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. पालिकेतील आणखी कर्मचाऱ्यांना लवकरच अटक होईल, असे संकेत पोलिसांकडून देण्यात येत आहे. घोटाळ्यात आणखी कर्मचाऱ्यांचा सहभाग निष्पन्न होत असून त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येईल, असे पोलीस सूत्रांकडून कळते.