वांद्रे-वरळी सी-लिंक ते वांद्रे-कुर्ला संकुल अशा उड्डाणपुलाच्या आड येणारा पश्चिम द्रुतगती मार्गावरील वांद्रे स्थानकाबाहेरील स्कायवॉक जमीनदोस्त करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईतील पहिला व सर्वाधिक वापर असलेला स्कायवॉक लवकरच इतिहासजमा होईल.

दहा वर्षांपूर्वी म्हणजे २००८ ला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वांद्रे स्थानकाबाहेर हा पहिला स्कायवॉक बांधून पूर्ण केला. वांद्रे पूर्वेला असलेले म्हाडा कार्यालय, कला नगर, वांद्रे कुर्ला संकुल आदी परिसराला जोडणारा हा स्कायवॉक मोठय़ा प्रमाणात वापरला जातो. पहिल्याच स्कायवॉकला पादचाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे मुंबईतील अनेक महत्त्वाच्या व गर्दीच्या रेल्वे स्थानकांबाहेर स्कायवॉक बांधण्याचे धोरण एमएमआरडीएने स्वीकारले. परंतु, फारच थोडय़ा स्कायवॉकचा वापर प्रवाशांकडून होत आहे. आता चार कोटी रुपये खर्च करून वांद्रय़ाचा स्कायवॉकही जमीनदोस्त करण्यात येणार आहे.

वांद्रे-वरळी सी-लिंकपासून वांद्रे-कुर्ला संकुलाला जोडण्यासाठी सुमारे ७१४ मीटर लांबीचा उड्डाणपूल बांधला जात आहे. मात्र या पुलाचे काम करण्यात वांद्रय़ातील स्कायवॉक अडथळा ठरत असल्याने तोडण्यात येणार आहे. सप्टेंबरमध्ये पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर या स्कायवॉकच्या दोन्ही मार्गिकांची नव्याने निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती प्राधिकरणाने दिली. स्कायवॉकची दक्षिणेकडील मार्गिका शनिवारी रात्री ११ ते रविवारी सकाळी ५ पर्यंत तोडली जाणार आहे. तर उत्तरेकडील मार्गिका रविवारी रात्री ११ ते सोमवारी सकाळी ५ दरम्यान तोडली जाईल.