अपघातातील मेंदूमृत महिलेच्या अवयवदानासाठी पतीचा पुढाकार

राज्य सरकारच्या जे. जे. रुग्णालयात एका मेंदूमृत रुग्णाचे अवयवदान जळगावमधील कुटुंबीयांनी पुढाकार घेतल्याने प्रथमच शक्य झाले आहे. जळगाव येथे राहणाऱ्या संगीता महाजन यांना १७ जुलै रोजी मोटरसायकलने धडक दिली होती. त्यांना या अपघातात गंभीर दुखापत झाली होती. पुढील तीन दिवस त्यांच्यावर जळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र प्रकृती स्थिरावत नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांचे पती राजेश महाजन यांनी २० जुलै रोजी संगीता यांना जे. जे. रुग्णालयात हलविले. येथे उपचारादरम्यान संगीता या मेंदूमृत झाल्याचे कळल्यावर डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांना अवयवदानाबाबत विचारणा केली. यावर संगीता यांचे पती राजेश यांनी अवयवदानास होकार दिला. राजेश हे १० वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले होते. त्यांच्या मुलांनाही लहान वयात आईचे छत्र गमवावे लागले आहे. राजेश यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. मात्र अशा परिस्थितीतही अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या गरजू रुग्णांसाठी त्यांनी पत्नीच्या अवयवदानासाठी पुढाकार घेतला. संगीता यांचे यकृत ज्युपिटर रुग्णालय व डोळे सर जेजे रुग्णालयात ठेवण्यात आले.

सर जे. जे. रुग्णालयात मेंदूमृत रुग्णांची संख्या जास्त असली तरी नातेवाईक अवयवदानासाठी तयार होत नसल्याचे जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. राजेश महाजन यांच्या सकारात्मक पावलामुळे समाजातील इतरांनाही अवयवदानाची प्रेरणा मिळेल. हे अवयवदान यशस्वी होण्यासाठी डॉ. कमलेश, डॉ. भोसले, डॉ. सचिन, डॉ. उषा, डॉ. प्रिया व डॉ. संजय सुरासे यांनी व जे.जे. रुग्णालयाच्या अवयवदान चमूने यासाठी परिश्रम घेतले आहेत, असेही डॉ. लहाने यांनी नमूद केले.

अवयवदानाचे प्रमाण कमीच!

राज्य सरकार भित्तिपत्रके, अवयवदात्यांच्या नातेवाईकांचा सत्कार, सार्वजनिक ठिकाणांवर जाहिराती यांसारखे उपक्रम राबवून समाजात अवयवदानाबाबत जागृती वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परिणामी खासगी रुग्णालयात अवयवदान व प्रत्यारोपणाच्या प्रमाणात वाढ होत असली तरी सरकारी व पालिका रुग्णालयात अपुऱ्या व्यवस्थेमुळे अवयवदानाची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. अवयवदानासाठी सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर अशा तज्ज्ञ संघाची आवश्यकता असते. पालिका रुग्णालयात याचा अभाव असल्याने अवयवदानाचे प्रमाण कमी आहे, असे काही तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी पालिकेच्या केईएम व शीव या रुग्णालयात एक-एक अवयवदान झाले आहे. मात्र या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची मानसिकता अवयवदानासाठी सकारात्मक असल्याचे दिसत नाही. त्यामुळे व्यवस्था असली तरी मेंदूमृत रुग्णांचे नातेवाईक अवयवदानासाठी पुढे येत नाहीत, असे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.