पाणी हा माणसाच्याच नव्हे तर समस्त जीवसृष्टीच्या जगण्याचा आधार आहे. त्यामुळेच पाण्याला ‘जीवन’ असेही समर्पक नाव लाभले आहे. पाण्याचे हे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी ‘साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी’ (एसआयईएस)ने २९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत ‘जलमेव जीवनम्’ हा खास कार्यक्रम आयोजित केला आहे. ‘एसआयईएस’ने ८० व्या वर्षांत पदार्पण केल्यानिमित्त वर्षभर जे विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत त्यातलाच हा एक अभिनव उपक्रम आहे.
पंतप्रधानांचे प्रमुख विज्ञानविषयक सल्लागार डॉ. आर. चिदम्बरम यांच्याहस्ते या कार्यक्रमातील प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. के. कस्तुरीरंगन हे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.
‘एसआयईएस’चे अध्यक्ष व्ही. शंकर यांनी सांगितले की, देशातील सर्व प्रमुख ९० नद्यांच्या पाण्याचे नमुने या उपक्रमासाठी गोळा केले गेले आहेत. या नद्यांच्या पाण्याची गोडी औरच असून उपक्रमात सहभागी होणाऱ्यांना थेंबभर पाण्याचाही आस्वाद घेता येणार आहे. ‘पाणी’ या विषयाभोवती केंद्रित झालेली भित्तीचित्रे, तैलचित्रे, प्रश्नमंजुषा आदी उपक्रमांनी ‘जलमेव जीवनम्’ची रंगत वाढणार आहे.  
जलसंधारणाच्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी बजाविलेले राजस्थानातील अल्वार जिल्ह्य़ातील राजिंदर सिंग आणि मोडक सागर येथे दररोज अतिरिक्त ठरून वाया जाणारे पाच कोटी गॅलन पाणी वाचविण्याचा उपाय शोधणारे मुंबई महापालिकेतील निवृत्त अभियंते प्रकाश लिमये या दोघांना विशेष पुरस्काराने गौरविले जाणार आहे. पुरस्कारात प्रत्येकी एक लाख रुपये, मानचिन्ह आणि पाच फूट उंचीचा लामणदिवा यांचा समावेश आहे. जलसंधारणाच्या प्रभावी कार्यक्रमातून गावाचा कायापालट केल्याबद्दल अहमदनगर जिल्ह्य़ातील हिवरे बाजार गावाचाही एक लाख रुपये व मानचिन्ह देऊन गौरव केला जाणार आहे.
या उपक्रमात भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई महापालिका, नवी मुंबई महापालिका, टपाल खाते आणि एशियन पेंटस्चे ‘जलवर्धिनी प्रतिष्ठान’ सहभागी होणार आहे. टपाल खात्याच्या महाराष्ट्र विभागातर्फे यावेळी ‘एसआयईएस एटी अँड वॉटर कन्झर्वेशन’ ही विशेष टपाल तिकिटे जारी केली जातील. त्याचबरोबर पाणी आणि निसर्ग या विषयावरील टपालतिकिटांचे प्रदर्शनही भरविले जाईल. ‘एसआयईएस’तर्फे लवकरच सात पुस्तके प्रकाशित होणार आहेत.
पाणी हेच जीवन, वर्षांतील ३६५ दिवसांच्या इतिहासातील घडामोडींच्या नोंदी, प्रेरक प्रार्थना तसेच देशभक्तीपर गीते या विषयांना ही पुस्तके वाहिली असून ती सर्व शैक्षणिक संस्थांना मोफत दिली जातील. जगातील ३७५ राष्ट्रगीतांची सीडीदेखील या पुस्तकासोबत देणार आहे.