ख्यातनाम चित्रकार आणि छायाचित्रकारांशी संवादाची संधी
अत्युत्तम आणि दर्जेदार छायाचित्रातील बारकावे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने ‘नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिग आर्ट्स’(एनसीपीए)च्या वतीने छायाचित्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २२ ते २६ ऑक्टोबरदरम्यान एनसीपीएतील ‘पिरामल आर्ट गॅलरी’ येथे अनेक ख्यातनाम छायाचित्रकारांची छायाचित्रे प्रदर्शित केली जाणार आहेत.यात भारतातील सुप्रसिद्ध छायाचित्रकार जगन मेहता आणि होमाय व्यारावाला यांनी काढलेली सर्वोत्तम छायाचित्रे प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.
२२ ऑक्टोबर दुपारी एक ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत,
२३ ऑक्टोबरला दुपारी दोन ते सायंकाळी सहावाजेपर्यंत,
२४ ऑक्टोबरला दुपारी तीन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत,
२५ ऑक्टोबरला दुपारी दोन ते सायंकाळी चार वाजेपर्यंत,
२६ ऑक्टोबरला दुपारी दोन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
यात छायाचित्रांमधील विविध पलूंचा धांडोळा घेतला जाणार आहे. छायाचित्रातील व्यवसाय, शिक्षण, डॉक्युमेंटरी, छायाचित्रांचे बदलते रूप, एखाद्या संवेदनशील घटनेत छायाचित्र काढताना नीतीशास्त्र किती महत्त्वाचे असते, अशा विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे.
जगभरात छायाचित्रे काढली जातात, परंतु छायाचित्रांकडे आजही एक संपूर्ण कला म्हणून पाहिले जात नाही. किंवा त्याकडे फार उत्साहीपणे पाहिले जात नाही. त्यामुळे पारंपरिक प्रदर्शनाच्या पुढे जाऊन ख्यातनाम चित्रकार आणि छायाचित्रकार यांच्यात चर्चासत्राचे आयोजन केले आहे.
त्यामुळे छायाचित्र या विषयाची खोलवर चर्चा होऊन त्याचा फायदा अनपेक्षितपणे प्रेक्षकांनाही होईल, असे नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिग आर्ट्सचे छायाचित्र विभागाचे प्रमुख मुकेश पारपियानी यांनी सांगितले.
या महोत्सवात जाहिरात क्षेत्रातील नामवंत छायाचित्रकार केवीन नुन्स हे ‘लाइव्ह फोटोशुट’ या विषयातील बारकावे उलघडून सांगणार आहे. तर भारतीय अद्ययावत पोशाख विषयातील सुप्रसिद्ध छायाचित्रकार विक्रम बावा हे कॅलेंडर शूट आणि छायाचित्राविषयी शिक्षणानंतरची संधी यावर बोलणार आहेत.
पुणे एसएसपीचे प्रमुख विशाल भेंडे आणि डिपाएलचे संस्थापक जगदीश अग्रवाल छायाचित्रातील संधी आणि व्यवसाय यावर संवाद साधणार असल्याचे पारपियानी म्हणाले.
याशिवाय ब्रेकिंग न्यूजच्या काळातही छायाचित्र काढताना कोणते नीतीशास्त्र पाळले जावे, यावर चर्चा केली जाणार आहे. तर शेवटच्या दिवशी ‘व्हाइल्डलाइफ फोटोग्राफी’ करताना रानटी हत्तींशी संवाद कसा साधवा यांची माहिती द व्हाइल्ड लाइफ फाऊंडेशचे संस्थापक आनंद िशदे देणार आहेत. या सत्रानंतर छायाचित्रकार आणि मान्यवरांशी थेट संवाद साधण्याची संधीही प्रेक्षकांना मिळणार आहे.