मालिका-चित्रपट निर्मात्यांची जोरदार लसीकरण मोहीम सुरू

मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे चित्रीकरणावर घालण्यात आलेले निर्बंध उठल्यानंतर लवकरच कामाला सुरुवात करण्याआधी कलाकारांपासून ते कामगारांपर्यंत प्रत्येकाचे लसीकरण व्हायलाच हवे, यासाठी मालिका-चित्रपटांच्या निर्मात्यांनी कं बर कसली आहे. एरव्ही फक्त चित्रीकरण आणि चित्रपट प्रसिद्धी-प्रदर्शनात अडकलेल्या बॉलीवूडमध्येही सध्या कुठे-कुठे कोणत्या संघटनेतर्फे  लसीकरण मोहीम राबवण्यात येते आहे, याची चर्चा आहे. ‘मेहबूब स्टुडिओ’पासून ते निर्मात्यांच्या कार्यालयांपर्यंत जिथे कलाकार चित्रीकरणासाठी किंवा चित्रपटाविषयी बोलणी करण्यासाठी हजेरी लावतात, तिथे आता कलाकारांच्या लसीकरणासाठी रांगा लागलेल्या दिसून येत आहेत.

मालिकांचे चित्रीकरण सध्या राज्याबाहेर सुरू आहे. लवकरच अनेक मालिका राज्यात आपापल्या पूर्वीच्या सेटवर परततील. त्यासाठीची पूर्वतयारी अनेक ठिकाणी सुरू असताना चित्रीकरणाआधी कलाकार, कामगार आणि तंत्रज्ञांचे लसीकरण होणे गरजेचे असल्याचे मत निर्माते व्यक्त करताना दिसत आहेत. हिंदी चित्रपटांच्या निर्मात्यांनीही आपापल्या चित्रपटाशी संबंधित कलाकार, तंत्रज्ञ, कामगारांसाठी लसीकरणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. एकता कपूरच्या ‘बालाजी टेलीफिल्म्स’ने आपल्या कर्मचाऱ्यांसह मालिका-वेबमालिका आणि चित्रपटाशी संबंधित चमूसाठी ‘बालाजी हाऊस’ आणि ‘निक्सन स्टुडिओ’ येथे लसीकरण मोहीम आयोजित केली होती. जसलोक रुग्णालयाच्या सहकार्याने आयोजित के लेल्या या लसीकरण मोहिमेत आत्तापर्यंत ६०० ते ८०० जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

‘यशराज फिल्म्स’ने गेल्या आठवडय़ापासूनच मोठया प्रमाणावर लसीकरण मोहीम सुरू के ली आहे. यात ‘यशराज’च्या कर्मचारी, कलाकारांबरोबरच ‘फे डरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लाइज’ या संघटनेशी संबंधित ३० हजार सदस्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचाही त्यांचा उद्देश आहे. ‘इम्पा’ आणि ‘स्क्रीनरायटर्स असोसिएशन’ यांनीही आपापल्या सदस्यांसाठी लसीकरण मोहिमेचे आयोजन के ले आहे.

हिंदीत कलाकार आणि निर्मात्यांनी एकत्रित येऊन वेगवेगळ्या वर्गातील लोकांसाठी लसीकरणाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. अभिनेता अजय देवगणने आपल्या ‘एनवाय फाऊं डेशन’ या संस्थेतर्फे  कलाकार आणि माध्यमकर्मीसाठी लसीकरण मोहीम आयोजित के ली होती. तर चित्रपटसृष्टीतील कामगारांना मोफत लस उपलब्ध व्हावी यासाठी दिग्दर्शक करण जोहर, राजू हिरानी आणि निर्माता महावीर जैन यांनी एकत्र येत लसीकरण मोहीम सुरू के ली आहे.

‘प्रोडय़ुसर्स गिल्ड ऑफ इंडिया’ या निर्मात्यांच्या संघटनेंतर्गत रोहित शेट्टी, फरहान अख्तरसारख्या मंडळींनी एकत्र येत ‘मेहबूब स्टुडिओ’त सहा दिवसांचा लसीकरण उपक्रम आयोजित केला होता. हा उपक्रम भक्ती वेदांत रुग्णालयाच्या सहकार्याने आयोजित के ला गेला. निर्माता साजिद नाडियादवाला यांनीही आपल्या ‘हिरोपंती २’, ‘तडप’, ‘बच्चन पांडे’, ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटांच्या चमूबरोबर कर्मचाऱ्यांचेही लसीकरण के ले. संगीतकार प्रीतम यांनीही संगीतक्षेत्रातील लोकांसाठी लसीकरण मोहिमेचे आयोजन के ले आहे. अजूनही अनेक लोक लसीकरण करण्यासाठी पुढे येत नाहीत, त्यांच्या मनातील भीती काढून त्यांचे लसीकरण करून घेणे हा आपला उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट के ले. ‘रिलायन्स एन्टरटेन्मेट’नेही मोठय़ा प्रमाणावर लसीकरण मोहीम राबवली. गोरेगाव चित्रनगरी येथेही लवकरच लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे.

निर्मात्यांचा लसीकरणासाठी पुढाकार

निर्माते स्वत:हून लसीकरणासाठी पुढाकार घेत आहेत. प्रसंगी पदरमोड करून आपापल्या कलाकार आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती निर्माते नितीन वैद्य यांनी दिली. ‘आयएफटीपीसी’ने याआधी दोन लसीकरण मोहिमा आयोजित केल्या होत्या. अंधेरीतील त्यांच्या कार्यालयात आत्तापर्यंत हजार जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. ‘आयएफटीपीसी’कडे काही निधी होता, ज्यातून कामगारांसाठी मोफत लसीकरण उपलब्ध करून देण्यात आले. अजूनही अनेक निर्मात्यांकडून यादी येत असून त्यानुसार लसीकरण केले जाणार आहे. लसीकरणात काही घोळ होऊ नये यासाठी कोकिलाबेन रुग्णालय आणि महापालिका यांच्या सहकार्यानेच लसीकरण मोहीम आयोजित केली जात आहे. कोकिलाबेन रुग्णालयात लसींचा साठा उपलब्ध झाल्यानंतर आम्हाला कळवण्यात येते, त्यानुसार लसीकरण आयोजित के ले जाते, अशी माहितीही वैद्य यांनी दिली.