ठाणे जिल्ह्य़ातील ज्या महापालिकांना अद्याप स्वत:चे पाण्याचे स्त्रोत निर्माण करता आलेले नाहीत, त्यांनी शहरात नव्या बांधकाम परवानग्या देऊ नयेत, अशी स्पष्ट भूमिका मांडून ठाणे जिल्हा नियोजन मंडळाच्या अखेरच्या बैठकीत पालकमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात वर्षांनुवर्षे सत्तेवर असणाऱ्या शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला.
राज्यात मुंबई महापालिकेनंतर स्वत:च्या मालकीचे धरण असणारी नवी मुंबई ही दुसरी महापालिका आहे. लोकसंख्या वेगाने वाढत असूनही ठाण्यासह जिल्ह्य़ातील इतर शहरे पाणी पुरवठय़ाबाबत परावलंबी आहेत. ठाण्यातील शहरी भागास पाणी पुरवठा करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेली शाई व काळू ही धरणे अद्याप कागदावरच आहेत. ठाणे महापालिकेने मध्यंतरी ‘स्टेम प्राधिकरण स्थापन करून पाणी पुरवठय़ाबाबत स्वावलंबी होण्याचा प्रयत्न केला होता. ठाण्याच्या पश्चिम विभागात घोडबंदर, कल्याण परिसरातील खडकपाडा, टिटवाळा आदी परिसरात झपाटय़ाने नागरीकरण सुरू असताना त्यांची पाण्याची गरज कशी भागविणार हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. ठाणे तसेच आसपासच्या परिसरात नव्याने उभ्या राहणाऱ्या नागरी वसाहतींना पाण्याची गरज भागविताना जुन्या रहिवाशांना मोठय़ा प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान महापालिकांनी नव्या बांधकामांना मंजुरी द्यावी की न द्यावी हा प्रश्न जिल्हा नियोजन मंडळाच्या अधिकार कक्षेत येत नसल्याचे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.