18 January 2019

News Flash

अकरावीचे वर्ग जुलैमध्ये?

अकरावीच्या अर्जाचा दुसरा भाग भरण्याची सुरुवात बुधवारपासून होणार आहे.

७० टक्के प्रवेश झाल्यावर वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी

अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून यंदा द्विलक्षी अभ्यासक्रमाचे प्रवेशही केंद्रीय पद्धीतीने होणार असल्यामुळे प्रवेश प्रक्रिया थोडी लांबणार आहे. मात्र त्याच वेळी सत्तर टक्के प्रवेश झाल्यानंतर महाविद्यालयांना वर्ग सुरू करता येणार आहेत. त्यामुळे नामांकित महाविद्यालयांचे वर्ग जुलैमध्येच सुरू होण्याची शक्यता आहे. अकरावीच्या अर्जाचा दुसरा भाग भरण्याची सुरुवात बुधवारपासून होणार आहे.

अकरावीची प्रवेश प्रक्रिया दर वर्षी अनेक महिने लांबते. सगळ्या महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अकरावीचे वर्ग सुरू होण्यासाठी ऑगस्टअखेर किंवा सप्टेंबर महिना उजाडतो. त्यानंतर वर्ग सुरू झाल्यावर पहिले सत्र घाईघाईने उरकण्याची वेळ महाविद्यालयांवर येते. पहिल्या सत्राचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अवघा एक किंवा दीड महिन्याचा कालावधी मिळतो. मुळातच दहावीच्या मोठय़ा सुट्टीनंतर महाविद्यालयांत आलेल्या मुलांच्या आधीच्या संकल्पना पक्क्या करणे, महाविद्यालयातील वातावरणाशी जुळवून घेणे, मराठी माध्यमातून आलेल्या विद्यार्थ्यांचे इंग्रजी पक्के करणे हे सगळे करतानाच अभ्यासक्रम पूर्ण करण्याची घाई महाविद्यालयांना करावी लागते. मात्र यंदा वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया दर वर्षीच्या तुलनेत लांबली असली तरी अकरावीचे वर्ग मात्र लवकर सुरू होणार आहेत. नामांकित महाविद्यालयांचे वर्ग दुसऱ्या यादीनंतरच तर जुलै अखेपर्यंत मोठय़ा महाविद्यालयातील वर्ग सुरू होऊ शकतील असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

यंदा अकरावीच्या नियमित चार फेऱ्या आणि त्यानंतर रिक्त रहिलेल्या जागांसाठी ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर दोन प्रवेश फेऱ्या घेण्यात येणार आहेत. नियमित चार फेऱ्या झाल्यानंतर होणाऱ्या दोन अतिरिक्त फेऱ्यांमध्ये प्रवेश न झालेले, ‘एटीकेटी’ मिळालेले, पुन्हा परीक्षा देणारे, प्रवेश प्रक्रियेतून कोणत्याही कारणासाठी बाहेर पडलेले विद्यार्थी यांना संधी देण्यात येणार आहे.

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची माहिती शिक्षण विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी मंगळवारी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. या वेळी मुंबई विभागाचे उपसंचालक राजेंद्र अहिरे, भवन्स महाविद्यालयाचे उप-प्राचार्य रमेश देशपांडे उपस्थित होते. अनेक महाविद्यालयांतील प्रवेश झालेले असतात. मात्र सगळ्यांचे प्रवेश होईपर्यंत या महाविद्यालयांना थांबावे लागते. त्यामुळे अध्यापनाचे दिवसही कमी होतात. त्यामुळे महाविद्यालये सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

मुंबई विभागातील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेची माहिती आणि अर्ज ttps://mumbai.11thadmission.net या संकेतस्थळावर पाहता येईल.

द्विलक्षीचे प्रवेश केंद्रीय

द्विलक्षी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रियाही यंदा केंद्रीय पद्धतीनेच होणार आहे. गेल्या वर्षी नियमित अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया झाल्यानंतर महाविद्यालयीन स्तरावर द्विलक्षी अभ्यासक्रमाचे प्रवेश करण्यात आले होते.

मात्र त्याबाबत विद्यार्थ्यांकडून आक्षेप घेण्यात आले. त्या पाश्र्वभूमीवर यंदा द्विलक्षी अभ्यासक्रमाचे प्रवेशही केंद्रीय पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला. द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या दोन प्रवेश फेऱ्या होणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी तीस महाविद्यालयांचे पसंतीक्रम द्यायचे आहेत. द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीसाठी १३ ते १८ जून या कालावधीत विद्यार्थी अर्ज करू शकतील. त्यानंतर २१ जूनला पहिली प्रवेश यादी जाहीर होणार आहे.

पहिल्या प्रवेश यादीनुसार २१ आणि २२ जून रोजी प्रवेश प्रक्रिया होणार आहे. २३ जून रोजी दुसऱ्या फेरीसाठीच्या रिक्त जागा जाहीर करण्यात येणार असून २३ ते  २५ जून या कालावधीत दुसऱ्या फेरीसाठी अर्ज भरायचे आहेत. द्विलक्षी अभ्यासक्रमाची दुसरी गुणवत्ता यादी २८ जून रोजी जाहीर होणार आहे. द्विलक्षी अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांनी नियमित फेरीसाठीही अर्ज भरायचा आहे.

पहिल्या महाविद्यालयात प्रवेश बंधनकारक

विद्यार्थ्यांने दिलेल्या पसंतीक्रमातील महाविद्यालयांपैकी पहिल्या क्रमांकाचे महाविद्यालय मिळाल्यास विद्यार्थ्यांला त्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागेल. पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतल्यास विद्यार्थी प्रवेश प्रक्रियातून बाहेर पडेल. त्याला प्रवेशाची पुन्हा संघी मिळणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पसंतीक्रम देताना शुल्क, घरापासूनचे अंतर, मिळालेले गुण, महाविद्यालयातील सुविधा अशा सर्व बाबींचा विचार करावा, असे आवाहन प्रवेश समितीने केले आहे. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेले विद्यार्थी वगळून बाकीच्या विद्यार्थ्यांना मिळलेल्या महाविद्यालयात प्रवेश नको असल्यास त्यांना पुढील फेरीत सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रत्येक फेरी झाल्यानंतर पुढील फेरीसाठी रिक्त जागांचे तपशील जाहीर करण्यात येतील. या रिक्त जागा आणि महाविद्यालयाचे पहिल्या फेरीतील शेवटच्या विद्यार्थ्यांचे गुण लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे पसंतीक्रम नव्याने देता येतील.

अर्ज आवश्यक

अल्पसंख्याक, व्यवस्थापन, संस्थांतर्गत कोटय़ातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया महाविद्यालयाच्या पातळीवर १३ ते २५ जून या कालावधीत होईल. कोटय़ातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनीही केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाइन अर्जातील दोन्ही भाग (विद्यार्थ्यांची माहिती आणि महाविद्यालयांचे पसंतीक्रम) भरणे आवश्यक आहे. कोटय़ातून प्रवेश निश्चित झाल्यानंतर विद्यार्थ्यांला नियमित प्रवेश प्रक्रियेतून वगळले जाईल.

First Published on June 14, 2018 1:58 am

Web Title: first year college fyjc