राज ठाकरे हे उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी राज ठाकरे यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. परंतु, राज यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी उत्तर भारतीय समाजाची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मनसेने मागील काही वर्षे ज्या पद्धतीने उत्तर भारतीयांना वागणूक दिली, मारहाण केली, त्याबद्दल आधी त्यांनी माफी मागावी. त्यानंतरच उत्तर भारतीय समाज त्यांना स्वीकारेल, असे वक्तव्य निरुपम यांनी केले आहे.

राज ठाकरे दिसणार उत्तर भारतीयांच्या मंचावर 

येत्या २ डिसेंबर रोजी कांदिवली येथे होणाऱ्या उत्तर भारतीय महापंचायतीच्या कार्यक्रमात राज ठाकरे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी याची माहिती आज दिली. त्यावर निरुपम यांनी राज यांच्या निर्णयावर आपले मत व्यक्त केले.

राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांशी संवाद साधण्याआधी उत्तर भारतीय समाजाची माफी मागावी. आमच्याकडून चूक झाली. आपली चूक मान्य करावी. त्यानंतर उत्तर भारतीयांशी त्यांनी संबंध जोडावेत. उत्तर भारतीय समाजही राज ठाकरे यांना मोठ्या मनाने स्वीकारेल, असे निरुपम म्हणाले.