मुंबई : बर्ड फ्लूच्या भीतीमुळे मांसाहारींनी माशांकडे मोर्चा वळवल्याने घाऊक बाजारपेठेत मासे  प्रतिकिलो १५० ते २५० रुपयांनी महागले आहेत.

त्याचबरोबर डिसेंबर ते मार्च या थंडीच्या काळात मासे समुद्राच्या   तळाशी जात असल्याने कमी सापडतात. त्यामुळेही माशांचे दर वाढल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.

‘यंदा थंडी अधिक असल्याने माशांची कमतरता आहे. मूळ बाजारातच मासे महाग मिळत असल्याने आम्हालाही भाववाढ  करावी लागते. परंतु भाववाढ होऊनही ग्राहकांची मागणी कमी झालेली नाही. बर्ड फ्लूच्या भीतीने ग्राहक माशांकडे वळले आहेत’ अशी प्रतिक्रिया मासे विक्रेत्या नैना पाटील यांनी दिली. मच्छीमार कृती समितीचे सरचिटणीस प्रफुल्ल भोईर यांच्या मते, ‘ओएनजीसी प्रकल्पामुळे मासे पकडण्यास व्यत्यय येत आहे. त्यामुळे मासे कमी मिळतात.

मासे कमी मिळाल्याने भाव वाढतो. त्यात थंडी असल्याने मासे पकडण्यासाठी अधिक कसरत करावी लागते.’ यामध्ये सर्वाधिक भाववाढ पापलेटच्या दरात झाली आहे. तब्बल ५०० रुपयांनी पापलेट महाग झाले असून ओले बोंबील क्वचितच मिळत आहेत.

माशांचे घाऊक बाजारातील दर

(प्रतिकिलो)

मासे                   पूर्वी        आता

कोलंबी              ३५०       ५५०

सुरमई                ३५०       ६००

पापलेट              ४००       ९००

ओले बोंबील      २००       ४००