सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ससून डॉकवरील गोदामे व्यापाऱ्यांकडून ताब्यात घेण्यास मुंबई पोर्ट ट्रस्टने सुरुवात केली असून त्याविरोधात मासे व्यापाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत बंद पुकारला आहे. मच्छीमार संघटनांनीही या संपाला पाठिंबा दिल्याने मंगळवारपासून माशांच्या निर्यातीवर तसेच स्थानिक बाजारपेठेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. मासे निर्यातीचे सर्वात मोठे केंद्र असलेल्या ससून डॉकच्या जमिनीची मालकी मुंबई पोर्ट ट्रस्टकडे आहे. या जागेवरील माशांची ६० गोदामे महाराष्ट्र राज्य मत्स्योद्योग महामंडळाला भाडेपट्टीने दिली होती. ही गोदामे महामंडळाने व्यापाऱ्यांना पोटभाडय़ाने दिली. या गोदामांसाठी रेडी रेकनर पद्धतीने भाडे देण्याची मागणी राज्य सरकारने नाकारल्याने पोर्ट ट्रस्टने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.