एकनाथ खडसे यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या आरोपांचे राळ उठले असतानाच पर्ससीन नेटच्या बोटींना खोल समुद्रात मासेमारी करण्यास परवानगी देण्याच्या निर्णयावरून ‘अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती’ने खडसे यांच्याबद्दल संशयाचे वातावरण तयार केले आहे. ३० कोटीच्या लाचप्रकरणातील खडसे यांचा अटकेत असलेल्या निकटवर्तीयानेच पैसे मागितल्याचा आरोपही केला.
ससून डॉक कुलाबा बंदरात पर्ससीन परवाने नसलेल्या ७०० अनधिकृत नौका मासेमारी करत होत्या. मासेमारीकरिता या नौका मालकांकडून कोटय़वधी रुपये गोळा केले जात होते. पर्ससीन जाळे बंदीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ फेब्रुवारीला जाहीर केला. तरीही पर्ससीन नौकांना १२ नॉटिकल मैल समुद्रात केंद्र शासनाच्या हद्दीत मासेमारीला परवानगी देण्याचा निर्णय जाहीर करून खडसे यांनी नौकामालकांना मोकळे रान दिल्याचा आरोप कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी पत्रकार परिषदेत
केला. पार्सेनील जाळ्याला जगभरातील अनेक देशात बंदी असूनही, राज्यात अनेक ठिकाणी अनधिकृतरित्या पार्ससीन मासेमारी केली जात आहे. हे जाळे तीन किलोमीटर पर्यंत सोडले जाते. त्यामुळे यात छोटी आणि मोठी दोन्ही प्रकारची मासळी अडकली जाते, याच्या एका फेरीतच किमान ३ ते ५ कोटी रुपयांची मासळी पकडण्यात येते त्यामुळे याचा परिणाम पारंपारिक मच्छिमारांवर होतो. यावेळी एक चित्रफीत दाखविण्यात आली यात ‘मी सरकार आहे, कायदा करु शकतो तसा रद्दही करु शकतो. मला कोणी आव्हान देण्याचा प्रयत्न करु नये. १२ नॉटिकल मैलाच्या पुढे पर्ससीन नेट वाल्यांना मी परवाने देणार. मला केंद्राचा वा राज्याचा कायदा कोणी शिकवू नये’असे या चित्रीकरणात खडसे बोलत असल्योच दिसत आहे.

भंगाळेला चौकशीसाठी बोलावले
प्रतिनिधी, मुंबई<br />महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि कुख्यात दाऊद इब्राहिम यांच्यात झालेल्या कथित संभाषणाप्रकरणी हॅकर मनिष भंगाळे याला दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शनिवारी चौकशीसाठी बोलावले आहे. भंगाळे याने पाकिस्तानी संकेतस्थळे हॅक करुन दाऊदच्या घरुन भारतातील कोणकोणत्या व्यक्तींशी संपर्क साधला आहे, याची माहिती जाहिर केली होती. मुख्यमंत्र्यांनी या प्रकाराची चौकशी एटीएसकडे सोपविली होती. शनिवारी सकाळी ११ वाजता एटीएसच्या मुख्यालयात भंगाळेला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.