राज्यांतर्गत विक्रीत घट; ग्राहकांच्या मागणीतही बदल

मुंबई : कठोर निर्बंध लागू झाल्यापासून मुंबईतील मासळीबाजार ओस पडले असून राज्यांतर्गत मागणी प्रचंड घट झाल्यामुळे मुंबईतील मत्स्यउद्योग अडचणीत आला आहे. समुद्र किनारा न लाभलेल्या राज्यातील बहुतांशी जिल्ह्य़ात मुंबईतून मासे पुरवले जातात. करोना संसर्गामुळे विविध जिल्ह्य़ांतून माशांची मागणी खूप कमी झाली आहे. तसेच माशांच्या किं मतीत भरमसाठ वाढ झाल्यामुळे गेल्या वर्षभरात मस्यप्रेमींचा कल कोंबडी आणि मटणाकडे वाढू लागला आहे.

मुंबईतील बंदरावर मासे खरेदीसाठी ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर, पनवेल आदी जिल्हा आणि तालुक्यांमधून मत्स्यविक्रेते येतात. कठोर निर्बंधांमुळे हा व्यवसाय ठप्प झाल्याचे मच्छिमार कृती समितीचे प्रफुल्ल भोईर यांनी सांगितले. ‘पहाटे बंदरावर आलेल्या विक्रेत्यांना मासे खरेदीकरून गाडय़ा भरून निघेपर्यंत सकाळचे ८ वाजतात. तिथून पुढे ठाणे, कल्याण, पनवेल, पालघर आदी ठिकाणी पोहोचायला त्यांना किमान दोन ते तीन तास लागतात. तोवर ११ वाजलेले असतात. सकाळी ११ नंतर बाजारपेठ सक्तीने बंद केली जाते. त्यामुळे त्यांना व्यवसाय करता येत नाही. आजचे मासे उद्या विकले तर लोक खरेदी करत नाही. त्यामुळे तेथील विक्रेत्यांनी मुंबईकडे पाठ फिरवली आहे. किंबहुना तेथील एकूणच विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे,’ असे भोईर म्हणाले.

‘मुंबईतील बंदरावर गेल्या काही महिन्यात माशांची उपलब्धता कमी झाली आहे. त्यामुळे माशांच्या किमतीवर  परिणाम झाला आहे. सध्या नागरिकांची क्रयशक्ती कमी झाल्यामुळे बाजारात कुणी फिरकत नाही. माशांचे अव्वाच्या सव्वा भाव लोकांना परवडणारे नाहीत. किरकोळ विक्रेते आमच्याकडून १०० किलो मासे नेत होते. ते आता केवळ २० किलोच मासे घेतात. त्यामुळे मुंबईहून आम्ही मासे आणणे बंद केले आहे,’ असे पुण्यातील मत्स्य व्यापारी महेश परदेशी यांनी सांगितले.

अशीच अवस्था इतर जिल्ह्यांची आहे. माशांचे भाव, प्रवास भाडे यावर होणाऱ्या खर्चातून नफा मिळविणे अवघड होते. वेळप्रसंगी भाव पाडून मासे विकावे लागतात. दिवसेंदिवस करोनाचे प्रमाण वाढत असल्याने ग्राहकही बाजारात फिरकत नाही. मग मासे मागणीअभावी फेकून द्यावे लागतात, असे सातारा, कोल्हापूर, रत्नागिरीतील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यात ग्रामीण भागातील ढाबे, उपहारगृहांचा व्यवसाय मंदावल्याने माशांच्या विक्रीवर परिणाम झाला आहे.

इतर बंदरावरही माशांचा आभाव

मुंबई पाठोपाठ रत्नागिरी, श्रीवर्धन, हरणे येथून मोठय़ा प्रमाणात मासे विविध जिल्ह्य़ांत जातात. परंतु तेथील बंदरांवर पुरेसे मासे मिळत नसल्याने व्यापारी मासे खरेदीसाठी तेथे जाण्याची जोखीम घेत नाहीत. कठोर निर्बंध, प्रवास खर्च, माशांचे भाव यामुळे तोटय़ात व्यवसाय करण्यापेक्षा न केलेला बरा, असा सूर व्यापाऱ्यांचा आहे.

स्थानिक बाजारही ओस

विक्रीसाठी सकाळी ७ ते ११ या वेळेतील मर्यादा मस्त्यविक्रेत्यांना त्रासदायक ठरत आहेत. विक्रेत्यांनाही बंदरावरून मासे घेऊन त्याची विक्री करेपर्यंत ९ ते १० वाजतात. पुढच्या तासाभरात पोलिसांकडून बाजार बंद करण्यास सांगितला जातो. त्यामुळे किती मासे आणायचे आणि किती विकायचे याचे गणित रोजच चुकते. ‘सकाळी ११ पर्यंतच्या निर्बंधाने मासे विक्रेत्या महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे, त्यामुळे सरकारने ही वेळ दुपारी २ पर्यंत वाढवावी,’ अशी मागणी मासे विक्रेत्या महिलांनी केली.