News Flash

उपलब्धतेअभावी मासे महागले

गेल्या काही वर्षांत समुद्रकिनाऱ्यालगत सुरू असलेल्या विविध बांधकामांचा फटका समुद्रातील जैवविविधतेला बसू लागला आहे.

मच्छीमारांना फटका; मत्स्याहारींची परवड

मुंबई : थंडीच्या दिवसात माशांचे वाढलेले दर उन्हाळ्यापर्यंत उतरणीला लागतात. परंतु यंदा एप्रिल उजाडला तरी माशांचे दर वाढतच आहेत. त्यामुळे मासे खरेदीसाठी अधिकची पदरमोड करताना चोखंदळ मांसाहारींना हात आखडता घ्यावा लागत आहे. निरनिराळ्या कारणांमुळे समुद्रकिनाऱ्यालगत मासे मिळेनासे झाले असून खोल समुद्राऐवजी किनाऱ्यालगत मासेमारी करणारे मच्छीमार संकटात सापडले आहेत, तर माशांची आवक कमी झाल्यामुळे मासेविक्री करणाऱ्यांना मोठा फटका बसू लागला आहे.

गेल्या काही वर्षांत समुद्रकिनाऱ्यालगत सुरू असलेल्या विविध बांधकामांचा फटका समुद्रातील जैवविविधतेला बसू लागला आहे. सध्या सुरू असलेल्या सागरी किनारा मार्ग प्रकल्पाच्या कामामुळेही किनाऱ्यालगत मासे सापडत नाहीत. तसेच पर्ससीन नौकांकडून केल्या जाणाऱ्या मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमारांनाही फटका बसत आहे, असे मुंबईतील मच्छीमारांचे म्हणणे आहे.

घाऊक बाजारात माशांचे दर वाढले आहेत. त्यामुळे भाव वाढल्याने किरकोळ मासळी बाजारात आणून मासे विकावे की विकू नये, अशी भ्रांत आहे. गेल्या महिनाभरात काही मासेविक्रेत्या महिलांनी मासेविक्री बंद के ली आहे. भाव वाढल्यामुळे लोक मासे घेत नाहीत. आणलेला मालही पडून राहतो. त्यामुळे मासेविक्री करून कुटुंब चालवणाऱ्या आगरी-कोळी महिलांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे, अशी खंत मासेविक्रेत्या नैना पाटील यांनी व्यक्त केली.

करदी, बोंबिल यांचा तुटवडा

मार्च-एप्रिल दरम्यान करदी आणि ओले बोंबिल हे मासे मुबलक असतात. त्यामुळे या माशांचे वाळवणही मोठ्या प्रमाणात केले जाते. परंतु यंदा या माशांचा तुटवडा निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे या माशांची किंमत कमी असल्याने ते खरेदी करण्याकडे लोकांचा

अधिक कल असतो, परंतु उपलब्धतेअभावी ग्राहकांचा हिरमोड होत आहे. यासोबतच पापलेटचेही प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे पापलेटचे दर वाढल्याचे मच्छीमारांनी  सांगितले.

मासळी बाजार ओस

करोनामुळे मासळी बाजारापासून दुरावलेला  ग्राहकवर्ग अद्याप बाजाराकडे फिरकलेला नाही. शिथिलीकरणानंतर व्यवसाय सुरू झाला, पण तोही जेमतेम. त्यात माशांची कमतरता, भाववाढ यामुळे ग्राहक मासे घेत नाहीत. ऑनलाइन मस्त्यखरेदीला नव्या पिढीची पसंती आहे. त्यामुळे शिथिलीकरणानंतरही माहीम, कुलाबा, शीव, धारावी, खार, मरोळ यांसह बहुतांशी मासळी बाजार ओस पडल्याचे विके त्या महिलांनी सांगितले.

मुंबईसह आसपासच्या सागरी हद्दीत पर्ससीन नौकांनी मोठ्या प्रमाणावर मासेमारी सुरू के ली आहे. मोठे जाळे टाकून यंत्राच्या साहाय्याने मासेमारी करण्यात येत आहे. यात लहान मासेही मारले जात असून मत्स्यसंपदा धोक्यात येत आहे. असेच सुरू राहिले तर स्थानिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येईल. विशेष म्हणजे या प्रकाराला बंदी असतानाही अनधिकृतपणे हे सुरू आहे.

– प्रफुल्ल भोईर, सरचिटणीस, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2021 12:02 am

Web Title: fisherman fish became expensive due to lack of availability akp 94
Next Stories
1 गृहविलगीकरणासाठी नवी नियमावली
2 उपाहारगृह व्यावसायिकांचा निर्बंधांना विरोध
3 ‘म्हाडा’च्या अभय योजनेत सेवा शुल्कावरील व्याज माफ
Just Now!
X