मुंबई : मच्छीमार नेते, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांचे शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन सुना आणि दोन नातवंडे असा परिवार आहे. तांडेल यांनी मच्छीमार कृती समितीच्या माध्यमातून मच्छीमारांच्या अनेक प्रश्नांवर आवाज उठवला. विशेषत: ट्रॉलर, एलईडी दिवे यांच्या साहाय्याने होणाऱ्या अवैध मासेमारीबाबत त्यांनी सातत्याने संघर्ष केला. अशा प्रकारच्या मासेमारीच्या अनेक घटना त्यांनी उघडकीस आणल्या. त्यांचा पाठपुरावा करून कारवाई करण्यास प्रशासनास भाग पाडले. त्यासाठी न्यायालयीन लढादेखील दिला. कोळीवाडय़ांच्या हद्दीचा मुद्दा, पुनर्विकासासाठी त्यांनी आंदोलने देखील केली.

किनारपट्टीवरील ३७५ गावांतील मच्छीमारांच्या वहिवाटी जमिनी सात-बारा उताऱ्यावर आणण्यासाठी, तसेच मुंबईतील कोळीवाडे व मच्छीमार वसाहतीना तीन चटई क्षेत्र मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. राज्याचे मत्स्य विकास महामंडळ, राष्ट्रीय मत्स्यजीवी सहकारी संघावर कार्यकारी संचालक पदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली.