सर्वाशी चर्चा करूनच निर्णय घेणार – मुख्यमंत्री

मुंबई : डहाणूजवळ वाढवण येथे मोठे बंदर उभारण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला असला तरी केंद्र सरकार आणि स्थानिक नागरिकांशी चर्चा करूनच बंदर उभारण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळाला दिल्याने या बंदरावरून महाराष्ट्र सरकार केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात टोकाची भूमिका घेणार का, असा प्रश्न आहे.

वाढवणमध्ये किनारपट्टीच्या लगत २० मीटर खोली असल्याने खासगीकरणातून सुमारे ६५ हजार कोटींचे बंदर उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. स्थानिक मच्छीमार आणि डहाणू परिसरातील नागरिकांचा या बंदराला विरोध आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बंदर उभारण्याचा निर्णय घेतला असला तरी राज्य सरकारची भूमिकाही महत्त्वाची आहे. राज्य सरकारने विरोधात भूमिका घेतल्यास बंदर उभारण्यात अडथळे येऊ शकतात. केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये फारसे सलोख्याचे संबंध नसल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारची भूमिका महत्त्वाची ठरेल.

वाढवण बंदर उभारण्याच्या विरोधात स्थानिक नागरिकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री ठाकरे यांची शुक्रवारी भेट घेतली. या वेळी केंद्र सरकारकडून प्रस्ताव आल्यावर सर्व संबंधितांशी चर्चा करण्यात येईल. सर्वाची भूमिका लक्षात घेऊनच निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली. यामुळे राज्य सरकारची भूमिका महत्त्वाची असेल.