मच्छीमारांना दिलासा

मुंबई : मासे निर्यातदारांनी खरेदीची तयारी दर्शवल्यामुळे थंडावलेल्या मासेमारी उद्योगाला चालना मिळणार आहे. मत्स्य व्यवसाय आयुक्तालयात बुधवारी झालेल्या बैठकीत निर्यातदारांनी याबाबत सकारात्मकता भूमिका मांडली.

पावसाळ्यात प्रजननाचा काळ असल्यामुळे १ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारीस पूर्णत: बंदी घातली जाते. सध्या करोनाच्या संकटामुळे मार्चपासूनच मासेमारीला अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. शिथिलीकरणाच्या टप्प्यातच नेमका मासेमारीबंदीचा कालावधी आल्याने गेले दोन महिने हा व्यवसाय थंडावला होता. ऑगस्टपासून मासेमारीस सुरुवात करण्यास परवानगी असली तरी निर्यातीबाबत निर्णय रखडला होता.

बुधवारी राज्याच्या मत्स्य आयुक्तालयात महाराष्ट्र मच्छीमार सहकारी संघटना, ससून डॉक, भाऊचा धक्का, छत्रपती शिवाजी मंडई येथील मासेमारी संस्था व व्यापारी यांचे प्रतिनिधी, निर्यातदार आणि निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष यांची बैठक झाली. या बैठकीत सर्व निर्यातदार संघटनांच्या अध्यक्षांकडून पूर्ण मासळी खरेदी करण्याबाबत आश्वासन मिळाल्याची माहिती राज्य सहकारी संघटनेचे अध्यक्ष रामदास संधे यांनी दिली. मासेमारीसंदर्भात राज्य व केंद्र शासनाच्या सर्व नियमावलींचे पालन करण्याची अट निर्यातदारांनी घातल्याचे राज्याचे मत्स्य व्यवसाय सहआयुक्त राजेंद्र जाधव यांनी सांगितले. त्यानुसार सर्वसंबंधितांना योग्य त्या सूचना दिल्याचे त्यांनी नमूद केले.

मासेमारीसाठी जाणाऱ्या बोटीवरील माणसांची संख्या, त्यांनी घ्यावयाची काळजी, निर्जंतुकीकरणाचे नियम या संदर्भात पोलीस, महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय अशा सर्व यंत्रणांशी गेल्या दोन महिन्यांत अनेकदा चर्चा झाली असून त्यानुसार अंतिम नियमावली ठरवली आहे. त्यास अंतिम मंजुरी मिळाल्यावर संपूर्ण किनारपट्टीवरील मासेमारीस गती मिळेल, अशी अपेक्षा संधे यांनी व्यक्त केली.

गेल्या वर्षी राज्यातील एकूण मत्स्य उत्पादनात ३२ टक्क्यांची घट झाली होती. गेल्या वर्षी लांबलेला पावसाळा आणि त्याचबरोबर अरबी समुद्रात झालेली चक्रीवादळे यामुळे मासेमारीचे दिवस कमी झाले होते. त्याचा परिणाम निर्यातीबरोबरच प्रक्रिया उद्योगावरदेखील झाला होता. यातून सावरल्यानंतर व्यवसाय स्थिरावेपर्यंत करोनाचे संकट आले आणि मासेमारी पुन्हा ठप्प झाली. मार्चपासून निर्यातदेखील घसरून २५ टक्क्यांवर आली.