23 September 2020

News Flash

मासेमारीही बंद, मासळी बाजारालाही मज्जाव

मुंबईतील आगरी-कोळी समाजाच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर

संग्रहित छायाचित्र

निलेश अडसूळ

केंद्र सरकारने मासेमारीला परवानगी दिली असली तरी टाळेबंदी आणि सामाजिक अंतराचे कारण पुढे करत मुंबईतील स्थानिक प्रशासनाने मासेमारीवर बंदी आणल्याने दोन महिने मासेमारी आणि मासळी बाजारही बंद आहेत. त्यामुळे मासेमारीवर गुजराण करणाऱ्या मुंबईतील आगरी-कोळी समाजाच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबईमध्ये १०हून अधिक प्रमुख बंदर आहेत तर एकूण ६२ प्रमुख मासळी बाजार, ४० हून अधिक गावठाण आणि किरकोळ बाजार आहेत. मासळी विकून साधारण १५ हजार आगरी-कोळी महिला आपला उदरनिर्वाह चालवत असतात. टाळेबंदीनंतर महिन्याभराने जीवनावश्यक वस्तूत माशांचा समावेश झाला. परंतु स्थानिक पातळीवर मच्छीमारांची अडवणूक सुरु आहे. त्यामुळे मासेमारी आणि पर्यायाने विक्री करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे.

‘सुरुवातीला महिनाभर समुद्रात जाण्यास पूर्ण बंदी होती. नंतर काहीशी सवलत दिली. परंतु त्यातही अनेक अट घातल्या गेल्या. मासेमारीचा व्यवसाय मनुष्यबळावर आधारित असल्याने समुद्रात दोनतीन माणसांनी जाऊन चालत नाही. त्यामुळे अनेकांनी हताश होऊन आपल्या नाव बंदराला आणून ठेवल्या. आता दहा दिवसात वादळी वारा सुरु होईल. त्यामुळे आमच्या पोटापाण्याचा प्रश्न अधिक बिकट होईल,’ असे वरळी कोळीवाडय़ातील अधिकारी व्यक्ती बाबू मुकादम यांनी सांगितले. मुंबईत मरोळ, वसई अशा बऱ्याच किनाऱ्यालगत मासेमारी सुरु आहे. परंतु, वरळी-वांद्रे सागरी सेतुमुळे पूर्वी वांद्रे, खार, माहीम, वरळीच्या किनाऱ्यालगत असलेले मासे आता खोल समुद्राकडे सरकले आहेत. परिणामी किनाऱ्यालगत मासेमारी करून हाताला काहीही लागत नाही, असे स्थानिक मच्छीमारांनी सांगितले.

कुलाबा, भाऊचा धक्का या प्रमुख ठिकाणाहून सर्वाधिक मासळी मुंबईभर पोहचते. परंतु याच बंदरांना टाळे लागल्याने आम्हाला मरोळ, मनोरी, वसई अशा छोटय़ा बंदरांवर धाव घ्यावी लागते. अनेक मासे विक्रेत्या महिलांचे रोजच्या विक्रीवर घर चालते. त्यामुळे उपजीविकेसाठी मध्यरात्री उठून लांबचा प्रवास करून त्या मासे आणतात. त्यातही दळणवळणाचे कोणतेही साधन नसल्याने हा प्रवास अधिक खडतर, खर्चिक होत असल्याचे कलिना येथील मासे विक्रेत्या नैना पाटील यांनी सांगितले. ‘या अडचणींमुळे १५ हजार मासळी विक्रेत्या महिला आणि आगरी-कोळी समाजच नाही तर बोटींवर जाणारे खलाशी, तांडेल, मदतनिस, बोटींचे मालक, मासे उतरवणारे हमाल ही सर्वच साखळी अडचणीत आली आहे,’ असे वर्सोव्यातील एका कोळी बांधवाने सांगितले.

वादळी वाऱ्याचे संकट तोंडावर

मे अखेर वादळी वारे आणि पावसाची चिन्हे दिसू लागतात. त्यामुळे समुद्रात जाण्यासाठी मज्जाव असतो. परिणामी नारळी पौर्णिमेपर्यंत तब्बल अडीच ते तीन महिने मासेमारी पूर्णत: बंद असते. साठवलेल्या माशांवर काही प्रमाणात मासे विक्री केली जाते. त्यासाठी मार्च ते मे महिन्यापर्यंत शक्य तितके मासे पकडून ते बर्फामध्ये साठवले जातात. यंदा मार्च ते मे हे तीनही महिने मासेमारीविना गेले. त्यात दहा दिवसांवर वादळी वारा येऊन ठेपल्याने अनेकांनी बोटी किनाऱ्यावर आणून ठेवल्या आहेत.

केंद्र सरकारने २० एप्रिलला मासेमारीला परवानगी दिली. पण ४३ अट घालण्यात आल्या. या अटींची पूर्तता होणे अशक्य असल्याने मासेमारी बंदच आहे. अनेकांचे पोट रोजच्या मासेविक्रीवर आहे, त्यांचा विचार सरकारने करावा. याबाबत मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांना अनेकदा निवेदन देऊनही कोणतीही दखल घेण्यात आली नाही.

– दामोदर तांडेल, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 12:40 am

Web Title: fishing is also closed and the fish market is closed abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 पालिका रुग्णालयांच्या कारभारावर बाह्य़ अधिकाऱ्यांची देखरेख
2 वृक्ष छाटणी परवानगी घरबसल्या
3 नगरसेवक निधीतून पीपीई किट खरेदीस मनाई
Just Now!
X