समुद्रात गेलेल्या मच्छीमार बोटी किनाऱ्यावर परत; माशांचे दर महागण्याची चिन्हे

श्रावण महिना आणि गणेशोत्सव संपल्यानंतर अनेकांना मांसाहाराचे वेध लागले असतानाच मुंबईत मासळीचा तुटवडा जाणवू लागला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि समुद्रात निर्माण झालेले वादळी हवामान यांमुळे मच्छीमारीसाठी गेलेल्या बोटी अध्र्या वाटेतूनच माघारी परतू लागल्या आहेत. त्यामुळे येते काही दिवस मुंबईत ताज्या मासळीची टंचाई होऊन दरांत वाढ होण्याची भीती आहे.

गेले अनेक दिवस दडी मारलेल्या पावसाने अनंत चतुदर्शीच्या मुहूर्तावर जोरदार पुनरागमन केले. परंतु त्यामुळे सध्या समुद्रात वादळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच मुंबईजवळ एक मासेमारी नौका बुडाल्याची घटना घडली. त्यामुळे सावधगिरी बाळगत मासेमारीसाठी समुद्रात दाखल झालेल्या नौका पुन्हा एकदा किनाऱ्याकडे परतू लागल्या आहेत. भाईंदरजवळील उत्तन परिसरातील बहुसंख्य बोटी सोमवारी चौक येथील बंदरात परतल्या.

अन्य ठिकाणीही अशीच परिस्थिती आहे. याचा मोठा फटका मासळीबाजारांतील व्यवहारांना बसला आहे.

श्रावण महिना आणि गणेशोत्सवाच्या काळात मांसाहार वज्र्य करणारे अनेक जण अनंत चतुर्दशीनंतर सामिष आहाराकडे वळतात. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मासळींची आवक घटली आहे.

त्यामुळे खवय्यांना काही दिवसांपूर्वी बाजारात दाखल झालेल्या मासळीवर समाधान मानावे लागत आहे. मच्छीमारांच्या बोटी रित्यानेच परतल्याने येते काही दिवस मत्स्यटंचाई जाणवण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांत पडणाऱ्या पावसामुळे आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छीमार समुद्रात उतरत नाही. तसेच समुद्रात मोठय़ा प्रमाणात पर्ससीन जाळे टाकले जात असल्याने बोंबील, कोंळबी इत्यादी सर्वसामान्यांना परवडणाऱ्या मासोळी फक्त १५ ते २० टक्केच शिल्लक आहे.

– दामोदर तांडेल, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती.

सध्या बाजारात जी मासोळी उपलब्ध आहे ती चार ते पाच दिवसांपूर्वी समुद्रात गेलेल्या ट्रॉलरवरची आहे. समुद्रातील पाच नॉटिकलच्या आत पकडलेली मासोळी ही ताजी असू शकते, मात्र यात बोंबील आणि टेंगलीसारखे मासेच मिळतात. काही दिवसांपूर्वीच गणेश विसर्जन झाल्याने मासोळीपेक्षा प्लास्टिक किंवा इतर कचराच जाळ्याला लागत आहे.

– विलास अनंत वरळीकर, युवा विभाग अध्यक्ष, नवपाटील जमात व गावकरी इस्टेट समिती 

बाजारात माशांच्या किमती

* सुरमई – ४०० ते ६०० रुपये (१ नग)

* कोळंबी- १५० रुपये वाटा

* बोंबील – ७० रुपये वाटा

* बांगडा – १०० रुपये (पाच नग)