|| प्रशांत देशमुख

२९ ऑगस्टला उपक्रमाचा प्रारंभ

तंदुरुस्ती राखण्यासाठी केंद्र सरकार ‘फि ट इंडिया’ हा उपक्रम पुरस्कृत करत आहे. व्यायामाचे महत्त्व तसेच खेळांमध्ये भाग घेऊन प्रकृती उत्तम राखावी म्हणून संपूर्ण देशात ‘फि ट इंडिया मूव्हमेंट’ची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे केंद्रीय क्रीडा सचिवांनी जाहीर केले आहे. त्याचा संदर्भ देत राज्य शासनाच्या क्रीडा विभागाने हा कार्यक्रम अमलात आणण्याचे निर्देश दिले.

राष्ट्रीय खेल दिनाच्या मुहूर्तावर २९ ऑगस्टला या उपक्रमाचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर होणार आहे. शारीरिक तंदुरुस्तीबाबत पंतप्रधान सकाळी दहा वाजता जनतेला शपथ देतील. राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना ही शपथ घेण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्याची सूचना केली आहे.नगर परिषद, ग्रामपंचायत, महापालिकेच्या सदस्यांनी संबंधित कार्यालयात शपथ घ्यायची आहे. यानिमित्ताने गावागावात मॉर्निग वॉक, छोटय़ा अंतराच्या मॅरेथॉन व तत्सम उपक्रम आयोजित करायचे आहेत. या उपक्रमास लोकप्रतिनिधी, मान्यवर खेळाडूंना निमंत्रित करण्याचे सुचविले आहे. नेहरू युवा केंद्र तसेच राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हायचे आहे. दिवसभरात विद्यार्थी, युवक, महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्याची सूचना करण्यात आली आहे.