महिलांच्या फिटनेस आणि व्यायामाबाबतच्या पूर्वग्रहांना छेदत स्वत: फिटनेसचा एक नवीन धडा घालून देणाऱ्या सेलेब्रिटी फिटनेस ट्रेनर लीना मोगरे यांच्याबरोबर थेट संवाद साधण्याची संधी आज, शुक्रवारी सायंकाळी होणाऱ्या ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहे. आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी ‘फिटनेस’ महत्त्वाचा हे सगळ्यांना माहिती असते, पण कुणी कसा, कधी आणि किती व्यायाम करायचा, त्याचे परिणाम काय होतील याबाबत मनात गोंधळ असतो. सेलेब्रिटींसारखे शरीरसौष्ठव केवळ नियमित व्यायामाने सगळ्यांना मिळू शकते का, असाही प्रश्न असतो. फिटनेसला जीवनशैलीत कसे बसवता येईल, याचा कानमंत्र लीना मोगरे या कार्यक्रमातून देतील. व्यायाम, आहार-विहार याविषयीच्या शंका थेट लीना मोगरे यांना विचारायची संधीही या वेळी मिळेल.
स्वत:चा फिटनेस ब्रॅण्ड निर्माण करणारी देशातली पहिली स्त्री पर्सनल फिटनेस ट्रेनर म्हणून लीना मोगरे यांची ओळख आहे. माधुरी दीक्षित, जॉन अब्राहम, बिपाशा बसू, कतरिना कैफ, कंगना रानौट अशा अनेक सेलेब्रिटींना लीना मोगरे यांनी फिटनेसचे धडे दिले आहेत. हे सेलेब्रिटी काही महिन्यात हवे तेवढे वजन घटवतात आणि पुन्हा वजन वाढवतातदेखील. हे केवळ व्यायामाने साध्य करणे शक्य आहे का, त्यासाठी नेमका कोणत्या पद्धतीने व्यायाम केला पाहिजे, व्यायामाला जोड देण्यासाठी प्रोटीन सप्लिमेंट्सची आवश्यकता असतेच का, त्याचे काय परिणाम होतात, नवीन आलेले व्यायाम प्रकार आणि आहार पद्धती (फॅड डाएट) याचे फायदे-तोटे काय याविषयी सविस्तर चर्चा लीना मोगरे यांच्यासोबत करता येईल. तरुण वयातच उद्भवणारे मधुमेह, रक्तदाब, कोलेस्ट्रॉलसारखे ‘लाइफस्टाइल डिसीझेस’ कसे रोखता येतील हेदेखील त्यांच्याकडून जाणून घेता येईल. केसरी प्रस्तुत व्हिवा लाउंज हा कार्यक्रम सर्वासाठी खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावर प्रवेश मिळेल.

कधी : आज, शुक्रवारी
कुठे : स्वा. सावरकर स्मारक सभागृह, शिवाजी पार्क, दादर (प.)
वेळ : सायंकाळी ५.४५