करोना संसर्गाचे प्रमुख केंद्र बनलेल्या तबलीगी जमातच्या दिल्ली येथील धार्मिक संमेलन आटोपून परतलेल्या पाच दाम्पत्यांनी काही दिवस धारावीत वास्तव्य केले. धारावीत करोना संसर्गामुळे ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला तेथे पाच महिला तर त्यांचे पती परिसरातील मशिदीत वास्तव्यास होते, अशी माहिती पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांना मिळाली. ही पाच दाम्पत्ये मूळची केरळची असून तेथील यंत्रणांनी त्यांचा शोध घेत वैद्यकीय चाचण्या केल्या आहेत. त्यापैकी काही व्यक्ती करोनाबाधित असल्याचे सांगितले जाते.

शाहूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत करोना संसर्गाने मृत्यू झाल्यानंतर संबंधित व्यक्ती वास्तव्यास असलेल्या इमारतीसह सुमारे ९० दुकाने पालिके ने ताब्यात घेतली. संबंधित इमारत, मशिदीसह या दाम्पत्यांनी ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य केले किंवा ज्या ज्या व्यक्तींशी संपर्क साधला त्या सर्वाची शोधाशोध धारावी आणि शाहूनगर पोलिसांनी सुरू केली आहे.

त्यापैकी बहुतांश व्यक्तींच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या पाच दाम्पत्यांव्यतिरिक्त आणखी तिघे मरकजहून परतले असून त्यांना दोन आठवडय़ांसाठी घरीच राहाण्याच्या सूचना आरोग्य अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत, असे समजते.