मुंबईतील पाच अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील गंभीर त्रुटींवर आता खुद्द तंत्रशिक्षण संचालनालयाने एका चौकशीच्या आधारे बोट ठेवल्याने या महाविद्यालयांची संलग्नता अडचणीत येण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे मुंबई विद्यापीठाच्या विद्वत् सभेत आज, शनिवारी मुंबईतील साठहून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या संलग्नतेचा मुद्दा चर्चेसाठी येणार आहे. त्यात या अहवालाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. कारण, सरकारच्या यंत्रणेनेच या महाविद्यालयांच्या त्रुटी उजेडात आणून दिल्याने या पाच अभियांत्रिकी महाविद्यालयांना संलग्नता देता येणार नाही, असे विद्यापीठातील सूत्रांचे म्हणणे आहे.
‘सिटिझन फोरम फॉर सँटिटी इन एज्युकेशनल सिस्टिम’ या संस्थेने राज्यातील शासकीय तसेच खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील त्रुटी व गैरकारभाराविरोधात मोठा लढा उभारल्यामुळे तंत्रशिक्षण संचालनालयापासून ते अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेपर्यंत (एआयसीटीई) सर्वानाच अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या मनमानी कारभारावर कारवाई करावी लागते आहे. फोरमचे समीर नानिवडेकर आणि प्रा. वैभव नरवडे यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील तसेच खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या जमिनी, अपुरा शिक्षक वर्ग, प्रयोगशाळांपासून महाविद्यालयांमध्ये असलेल्या विविध त्रुटींचा लेखाजोखा मांडला आहे. त्याचप्रमाणे एआयसीटीईच्या मानकानुसार आवश्यक व प्रत्यक्ष असलेल्या सोयीसुविधांची माहिती आणि तंत्रशिक्षण संचालनालयाच्या चौकशी समितीचा अहवाल स्वयंस्पष्ट असून विद्यापीठाच्या बैठकीत त्रुटी असलेल्या पाच महाविद्यालयांना संलग्नता दिल्यास कुलगुरू राजन वेळुकर यांच्यावरही फौजदारी कारवाईसाठी पाठपुरावा करावा लागेल, असा इशारा फोरमने दिला आहे.
मुदलातच संलग्नतेच्या विषयाचीच चौकशी होणे आवश्यक आहे. कारण गेल्या चार वर्षांमध्ये सलग्नतेसाठी विद्यापीठाने केवळ संबंधित संस्थांकडून पैसे घेतले. मात्र सलग्नता देण्याबाबतच्या समितीने कोणत्याही अभियांत्रिकी महाविद्यालयाची पाहणी केली नसल्याने विद्यापीठाच्या एकूणच कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वी तंत्रशिक्षण संचालकांना न्यायालयाने एक रुपया दंड ठोठावला होता. आता मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंनी संलग्नतेबाबत दाखविलेल्या उदासीनतेसाठी त्यांच्यावर कोणती कारवाई होणार,असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.  
कुलगुरू राजन वेळूकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या विद्वत् परिषदेच्या बैठकीत अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या संलग्नतेचा विषय येणार आहे. महाविद्यालयांना खिरापतीसारख्या संलग्नता दिल्या गेल्यास कुलगुरूंसह संपूर्ण विद्वतं परिषदेच्या हेतूविषयी प्रश्न उपस्थित होऊ शकतो.
– विद्वत परिषदेचा एक ज्येष्ठ सदस्य.
यांच्यावर ठपका
* लोकमान्य टिळक कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, नवी मुंबई
* एसआयईएस स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी, नेरूळ
* इंदिरा गांधी कॉलेज, कोपर खैरणे
* दत्ता मेघे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, ऐरोली
* वाटुमल इन्स्टिटय़ूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग, वरळी
या पाच महाविद्यालयांमधील विविध त्रुटींसंदर्भात ‘तंत्र शिक्षण संचालनालया’च्या चौकशी समितीने अहवाल तयार केला आहे. हा अहवाल एआयसीटीई आणि मुंबई विद्यापीठाकडे कारवाईसाठी पाठविण्यात आला आहे. विद्यापीठाने त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. आजच्या बैठकीत या पाच महाविद्यालयांच्या संलग्नतेबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे.