मुंबईतील कुलाबा भागात असलेल्या फोर्ट कॉनव्हेंट स्कूल या प्रतिष्ठित शाळेतून पाच मुली बेपत्ता झाल्या होत्या. ज्या आज दुपारी कुर्ला स्थानकात सापडल्या आहेत. या पाचही मुली आठवीत शिकणाऱ्या होत्या. शुक्रवारी या मुलींचे ओपन हाऊस होते. परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे या मुली शुक्रवारी दुपारी २.३० वाजल्यापासून बेपत्ता झाल्या होत्या. शाळा सोडल्यावर या पाचही मुली सुरूवातीला गिरगाव चौपाटी या ठिकाणी गेल्या. त्यानंतर त्या हँगिंग गार्डन या ठिकाणी गेल्या. हँगिग गार्डन परिसरात काही वेळ घालवल्यावर या पाचही मुली दादरला गेल्या. तिथे काही वेळ घालवल्यावर त्या ठाण्याला  गेल्या होत्या. परीक्षेत कमी गुण पडल्याच्या नैराश्यातून या मुली शुक्रवारपासून आजपर्यंत फिरत होत्या असे पोलिसांनी सांगितले.

आज दुपारी ४.३० च्या सुमारास या पाचही मुली कुर्ला स्थानकात रडत बसल्या होत्या. या मुलींच्या नातेवाईकांपैकी एकाने त्यांना पाहिले आणि पोलिसांना कळवले. ज्यानंतर या मुलींचा शोध लागला.  या मुलींपैकी एकाही मुलीकडे मोबाईल नव्हता त्यामुळे त्या नेमक्या कुठे आहेत हे पोलिसांना लोकेशनच्या आधारे शोधता येत नव्हते. मात्र आज दुपारी या पाच मुली कुर्ला या स्थानकातील बाकावर रडत बसल्या होत्या तेव्हा त्यांना त्यांच्यापैकी एकीच्या नातेवाईकाने त्यांना पाहिले आणि पोलिसांना याबाबतची सूचना दिली. त्यानंतर पोलिसांनी या सगळ्या मुलींना पोलीस ठाण्यात आणले. तिथे त्यांचा जबाब नोंदवून घेतला आणि या सगळ्या मुलींना त्यांच्या घरी पाठवण्यात आले आहे अशी माहिती समजते आहे.

शुक्रवारी दुपारी २.३० च्या सुमारास या मुलींची शाळा सुटली. काल या शाळेचे ओपन हाऊस होते. या पाचही मुली आठवीत शिकणाऱ्या आहेत. या मुलींबाबत अद्याप आज दुपारर्यंत कोणतीही माहिती मिळाली नव्हती. परीक्षेत कमी गुण मिळाल्याने आम्ही शाळा सोडून फिरत होतो असे या मुलींनी आपल्या जबाबात सांगितले.पोलिसांनी या मुलींचा शोध शुक्रवार संध्याकाळपासूनच सुरू केला होता. आता त्या घरी परतल्याने त्यांच्या पालकांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे.