मुंबईत भररस्त्यातून अपहरण झालेल्या व्यावसायिकाचा शोध लावण्यात क्राइम ब्रांचला यश मिळालं आहे. मालाडमधील दिंडोशी येथून ४५ वर्षीय राकेश पांडे यांचं अपहरण करण्यात आलं होतं. रविवारी रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता. अपहरणाचं सीसीटीव्ही समोर आलं होतं. यामध्ये मास्क घालून असणारे आरोपी राकेश पांडे यांचं अपहरण करताना दिसत होते.

पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना अटक केली असून यामध्ये अहमदनगरमधील एका गँगस्टरचाही समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी प्रदीप सरोदेने (३४) चौकशीदरम्यान राकेश पांडेने आपल्या वडिलांकडून घेतलेले पैसे परत केले नव्हते, यामुळेच अपहरण केलं असा दावा केला आहे.

याप्रकरणी क्राइम ब्रांच आणि दिंडोशी पोलीस दोन्ही टीम चौकशी तपास करत आहेत. दरम्यान आरोपींना अटक केल्यानंतर क्राइम ब्रांचने त्यांना दिंडोशी पोलिसांकडे सोपवलं आहे. प्रदीप सरोदेवर जवळपास १० गुन्हे दाखल आहेत. २०१९ लोकसभा निवडणुकीत सरोदे शिर्डी मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढला होता. या निवडणुकीत त्याला १५ हजार मतं मिळाली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याशिवाय राकेश पांडे याच्यावरही फसवणुकीसह काही गुन्हे दाखल आहेत.

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “रविवारी राकेश पांडे दिंडोशीमध्ये कार पार्क करुन बाहेर आले असता मास्क घातलेल्या तिघांनी अपहरण केलं. जबरदस्ती कारमध्ये बसवलं आणि तेथून पळ काढला. संपूर्ण घटना पाहिलेल्या एका व्यक्तीनो नियंत्रण कक्षाला फोन करुन माहिती दिली. यानंतर अज्ञातांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला”.

राकेश पांडेंना नाशिकला नेल्यानंतर सोडून देण्यात आलं. त्यानंतर ते घरी परतले. अपहरण कोणी केलं याची आपल्याला माहिती नसल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं. सीसीटीव्ही तपासलं असताना मुख्य आरोपी प्रदीप सरोदेची ओळख पटली. यानंतर आरोपींचा शोध घेण्यासाठी नवी मुंबई, ठाणे आणि अहमदनगरला टीम पाठवण्यात आल्या. प्रदीप सरोदेला अहमदनगरमध्ये तर इतर चौघांना ठाण्यातून अटक करण्यात आली.

“प्रदीप सरोदेचा दावा आहे की, राकेश पांडेने वडिलांकडून काही कामासाठी एक कोटी रुपये घेतले होते. ते काम पूर्ण केलं नाही आणि पैसेही परत केले नाहीत. त्यामुळे आपण त्याचं अपहरण केलं आणि पैसे परत देण्यासाठी धमकावलं,” अशी माहिती क्राइम ब्रांचचे पोलीस निरीक्षक महेश तावडे यांनी दिली आहे.