मुंबई : बनावट पॅनकार्ड आणि आधारकार्डच्या साहाय्याने २६ लाख रुपयांचे ई-कर्ज मिळवणाऱ्या ५ जणांना मुंबई मध्य विभागाच्या सायबर पोलिसांनी अटक केली आहे. अर्ली सॅलरी कंपनीकडून आरोपींनी ई—ुव्हाऊचर स्वरूपात हे कर्ज मिळवले होते. याप्रकरणी परवेज शाह, फिरोज शाह, फैज शाह, अमजद अब्दुल खान, सलीम शेख यांना पोलिसांनी अटक केली आहे.

करोनामुळे प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन ग्राहकांची पडताळणी करणे शक्य नसल्याने ऑनलाईन पडताळणीच्या आधारेच कंपन्यांकडून ई—व्हाऊचर स्वरूपात ग्राहकांना कर्ज दिले जात होते. पंधरा आरोपींनी याचा फायदा उचलून बनावट आधार कार्ड, पॅनकार्ड आणि बँक स्टेटमेंटच्या आधारे डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत २६ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. आरोपींनी हे कर्ज अमेझॉन गिफ्ट स्वरूपात घेतले होते. बनावट ईमेलच्या आणि सिम कार्डच्या आधारे आरोपींनी या गिफ्टचा वापर करून टीव्ही, फ्रीज, मोबाईल, एसी, वॉशिंग मशीन आदी वस्तू खरेदी केल्या होत्या.

दरम्यान, आरोपींनी कर्ज परतफेड न केल्याने कंपनीने त्यांच्याविरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पाच आरोपींचा ठावठिकाणा शोधून काढला. पोलिसांनी त्यांच्याकडून ६० बनावट आधार कार्ड, ६३ पॅनकार्ड आणि आरोपींनी खरेदी केलेल्या  ५ लाख ७१ हजार रुपयांच्या वस्तू जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय गोविलकर यांनी दिली.