मुंबईतील करोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने मुंबई महापालिकेने पाच रुग्णालये ‘करोना कोव्हिड १९ची समर्पित रुग्णालये’ म्हणून निश्चित केली आहेत. यात पालिकेचे कस्तुरबा रुग्णालय, पालिकेच्या अखत्यारीतील सेव्हन हिल्स रुग्णालय, राज्य शासनाचे सेंट जॉर्ज रुग्णालय, सैफी व नानावटी या दोन खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. यामुळे करोनाची लक्षणे असलेल्या व अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांवर अधिक प्रभावी व यथायोग्य उपचार करणे शक्य होणार आहे.

करोनाची लक्षणे नसतानाही ज्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत अशा ६० वर्षांखालील रुग्णांसाठी सात ठिकाणी विलगीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. पालिकेचे नागपाडा येथील प्रसूतिगृह व एसटीडी क्लिनिक, लीलावती रुग्णालयाच्या मागील प्रसूतिगृह, अंधेरी परिसरातील सार्वजनिक बांधकाम खात्याचे अतिथीगृह, पंजाब गल्ली येथील ‘डायग्नोस्टिक सेंटर, पवईचे एमसीएमसीआर, शिवाजीनगर येथील नागरी आरोग्य केंद्र, वांद्रे परिसरातील महात्मा गांधी मंदिराचे सभागृह येथे ही विलगीकरण केंद्रे आहेत.

झोपडपट्टी, चाळ इत्यादी दाटीवाटीच्या परिसरातील बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अतिधोकादायक (हाय रिस्क) व्यक्तींचे विलगीकरण केले जाणार आहे. यासाठी पालिकेच्या विभाग कार्यालयांनी ताब्यात घेतलेली छोटी उपाहारगृहे, लॉज, धर्मशाळा, इत्यादी ठिकाणे वापरली जाणार आहेत. विलगीकरण केलेल्या व्यक्तींच्या दैनंदिन गरजा त्याच ठिकाणी भागवल्या जाण्याच्या अनुषंगाने आवश्यक ते नियोजन करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी संबंधित विभागस्तरीय साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.