गोराई येथील बंगल्यात झालेल्या ८० लाख रुपयांच्या चोरीप्रकरणी बोरिवली पोलिसांनी पाच नेपाळी सुरक्षा रक्षकांना अटक केली आहे. हे पाचही आरोपी याच परिसरात सुरक्षा रक्षकांचे काम करतात. त्यांनी ३ फेब्रुवारी रोजी बंगल्यातील मुख्य दरवाजाचे कुलुप फोडून चोरी केल्याचे उघड झाले आहे.
बोरीवली पश्चिमेच्या गोराई दोन परिसरात शिवमणी मिश्रा यांचा मैत्री छाया हा एकमजली बंगला आहे. मिश्रा यांच्या मालकीचा पेट्रोलपंप असून ते उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे आमदार विजय मिश्रा यांचे नातेवाईक आहेत. २८ जानेवारी रोजी मिश्रा कुटुंबीय कुंभमेळ्यासाठी उत्तरप्रदेशात गेले होते. ११ फेब्रुवारीला ते घरी परत आले. त्यावेळी त्यांच्या घरात चोरी झाल्याचे उघड झाले.
चोरांनी घरातील सहा लाख रुपये, तीन किलो सोने, परवाना असलेले रिव्हॉल्वर आदी ८० लाख रुपयांचा ऐवज पळवून नेला होता. या बंगल्यात कुणी सुरक्षा रक्षक नव्हता तसेच सीसीटीव्ही कॅमेराही बसविण्यात आलेला नव्हता.
मिश्रा यांच्या बंगल्याशेजारील बंगल्यात गाडी धुण्याचे काम करणारा भरत विश्वकर्मा याच्यावर पोलिसांचा प्राथमिक संशय होता. भरतनेच अन्य पाच साथीदारांसह ही चोरी केल्याची माहिती उघड झाली. त्यानंतर उपायुक्त डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बोरिवली पोलीस ठाण्याचे निरीक्षक (गुन्हे) रवी अडाणे यांच्या पथकाने रविवारी रात्री गोराई पुल परिसरातून रतन विश्वकर्मा (२०), कमाल विश्वकर्मा (२०), हेमाल विश्वकर्मा (२८), कपूर सिंग (४०) आणि मदन सिंग या पाचजणांना अटक केली. भरत विश्वकर्मा हा अद्याप फरार आहे.