रेल्वेच्या मासिक पासात दुपटीपेक्षा जास्त वाढ करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतल्यानंतर धाबे दणाणलेल्या मुंबईकरांनी गेल्या चार दिवसांपासून तिकीट खिडक्यांसमोर रांगा लावल्या होत्या. या प्रचंड रांगांमुळे प्रवाशांना कितीही त्रास झाला असला, तरी रेल्वेला मात्र त्याचा पुरेपूर फायदा झाला. गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेवर तब्बल पाच लाख लोकांनी मासिक ते वार्षिक पास काढले. विशेष म्हणजे एका वर्षांचा पास काढणाऱ्या प्रवाशांची संख्याही अध्र्या लाखापेक्षा जास्त होती. त्यामुळे या चार दिवसांमध्येच रेल्वेने प्रचंड उत्पन्न कमवले आहे. हा आकडा कळू शकलेला नाही. त्यामुळे रेल्वेला झटपट उत्पन्न मिळवून देण्यासाठीच केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने दरवाढीची आवई उठवली नाही ना, अशी शंका आता प्रवासी घेत आहेत.
रेल्वेने मासिक पासच्या दरात दुपटीपेक्षा जास्त दरवाढ केल्याचा निर्णय २० जून रोजी घेण्यात आला. हा निर्णय लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर सध्या अगदीच कमी किमतीत मिळणारा मासिक, त्रमासिक, सहामाही पास दरवाढीनंतर अगदीच आवाक्याबाहेर जाणार असल्याचे सामान्य प्रवाशांच्या लागलीच लक्षात आहे. त्यामुळे शनिवारपासून रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवरील गर्दी अचानक वाढली. ही सर्वच गर्दी काढण्यासाठी असल्याने साधे तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना एटीव्हीएमचा आसरा घ्यावा लागला.
त्यातच मध्य रेल्वेने काढलेल्या पत्रकामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण होते. या पत्रकात २२ जूनपासूनच नव्या दराने पास देण्यात येतील, असे म्हटले होते. त्यामुळे मध्य रेल्वेवरील पासची विक्री काही प्रमाणात कमी झाली. पण हा संभ्रम दूर झाल्याने पुन्हा एकदा मध्य रेल्वेवरील सर्वच प्रमुख स्थानकांवर झुंबड उडाली. या गर्दीला सेवा देण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने अनुक्रमे १४ आणि १२ जादा खिडक्याही सुरू केल्या. तसेच आपल्या तिकीट बुकिंग क्लार्कना जास्त काळ कामाला लावले. सोमवारी या गर्दीने अक्षरश: कहर केला. मंगळवार हा दरवाढीच्या आधीचा शेवटचा दिवस असल्याने मंगळवारीही तोबा गर्दी होती. चर्चगेट स्थानकावर तर पहिल्यांदाच सर्व तिकीट खिडक्या सुरू असल्याचे चित्र दिसत होते.
या अभूतपूर्व विक्रीनंतर मंगळवारी संध्याकाळी अचानक भाडेवाढ मागे घेऊन कमी करण्यात आल्याचा निर्णय दिल्लीवरून आला. दरवाढीच्या भीतीने अनेकांनी ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये संपणाऱ्या आपल्या पासचेही नूतनीकरण केले होते. त्यामुळे त्यांची चांगलीच पंचाईत झाली. मात्र आता पुढील तीन ते सहा महिने तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी होणार असल्याचे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.