देशभरातील सुमारे दहा कोटी महिलांना केंद्र  सरकारच्या पंतप्रधान वीमा सुरक्षा योजनेची ‘रक्षाबंधन भेट’ देण्याची योजना भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाने आखली आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने देशभर महिलांशी संपर्क व संवाद साधून त्यांना भाजपशी जोडले जाणार आहे. एकीकडे भाजपने सदस्य नोंदणीत दहा कोटींचा आकडा गाठला असताना मोर्चाने महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी वीमा योजनेची शक्कल लढविली आहे. याशिवाय रक्षाबंधनाच्या दिवशी देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर महिला मोर्चाच्या पदाधिकारी सैनिकांना राखी बांधणार आहेत.
महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर म्हणाल्या की, सुमारे पाच कोटी महिलांना  विमा सुरक्षेची भेट देण्यात येईल. येत्या २९ ऑगस्ट रोजी देशभर रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने समाजातील विविध स्तरांतल्या महिलांना विमा सुरक्षेची भेट देण्यात येईल. या महिलांचा पंतप्रधान सुरक्षा विमा काढण्यात येईल. यासाठी लागणाऱ्या खर्चाबद्दल त्यांनी सांगितले की, पक्षाच्या माध्यमातून हा खर्च केला जाणार आहे. त्याबरोबर समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांची मदत घेतली जाईल. राज्यनिहाय शिबिरांचे आयोजन त्यासाठी केले जाईल. आतापर्यंत सुमारे साडेतीन ते चार कोटी महिलांचा विमा काढण्यात आल्याचे रहाटकर म्हणाल्या. केंद्राच्या कल्याणकारी योजनांचे पक्षस्तरावरून ‘मार्केटिंग’ करण्यात येत आहे.