महाराष्ट्राच्या विधीमंडळ इतिहासात सर्वांत लज्जास्पद ठरलेल्या आमदारांनी पोलिस अधिकाऱयाला मारहाण करण्याच्या प्रकरणात पाच आमदारांना नऊ महिन्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी घेतला. 
नालासोपाऱयातील बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राम कदम, भारतीय जनता पक्षाचे जयकुमार रावल, शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल आणि राजन साळवी यांना ३१ डिसेंबर २०१३ पर्यंत निलंबित करण्यात आले आहे. या पाचही आमदारांना मुंबई आणि नागपूरमधील विधानभवनाच्या आवारात येण्यास, सभागृहाच्या कामकाजात सहभाग घेण्यास अध्यक्षांनी बंदी घातली आहे.
पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना या पाचही आमदारांनी विधानभवनाच्या प्रांगणात मंगळवारी बेदम मारहाण केली होती. त्यामुळे सूर्यवंशी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कायदेमंडळाच्या आवारातच आमदारांनी कायदा हातात घेऊन पोलिस अधिकाऱयाला मारहाण केल्यामुळे आमदारांवर कडक कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरांतून करण्यात आली होती.
विधानभवनाच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱयातील चित्रीकरण बघितल्यानंतर वळेस-पाटील यांनी या पाचही आमदारांचे निलंबन करण्याचा निर्णय घेतला. पोलिस अधिकाऱयाला मारहाण करणाऱयांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले होते.