लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मराठी माध्यमांच्या शाळेतील पटसंख्या घसरू लागल्यामुळे पालिकेच्या आणखी पाच मराठी शाळा बंद करण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली आहे. या शाळा दुसऱ्या शाळांमध्ये विलीन करण्यात येणार आहेत.  वरळी, शिवडी, वडाळा अशा मराठीबहुल भागातील या शाळा आहेत.

मराठी माध्यमासह हिंदी, उर्दू, इंग्रजी, गुजराती, तमिळ, तेलगू, कन्नड या आठ माध्यमांच्या शाळा पालिकेतर्फे चालवल्या जातात. त्यात मराठी माध्यमाच्या सर्वाधिक शाळा आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत इंग्रजी माध्यमाकडे विद्यार्थ्यांचा व पालकांचा कल वाढल्यामुळे मराठी शाळा ओस पडू लागल्या आहेत. विद्यार्थ्यांअभावी दरवर्षी पालिकेडे मोठय़ा प्रमाणावर शाळा बंद करण्याचे प्रस्ताव येत असतात. या शाळा जवळच्याच पालिका शाळेत विलीन केल्या जातात. अशाच आणखी सहा शाळा विलीन करण्यात येणार आहेत. त्यात पाच मराठी तर वरळीतीलच एका तेलगू शाळेचा समावेश आहे.

महापालिका प्रशासनाने पाच मराठी शाळांसह एक तेलगू शाळा जवळील शाळेत विलीन करण्याचे प्रस्ताव नुकत्याच झालेल्या  शिक्षण समितीच्या पटलावर मांडले होते. हे प्रस्ताव शिक्षण समितीने राखून ठेवले आहेत.

शिक्षकांचे अन्य शाळांमध्ये समायोजन

वरळी लेबर कॅम्प येथील मराठी शाळा क्रमांक दोन, वरळी नाका महापालिका शाळा क्रमांक दोन या दोन्ही शाळांमध्ये एकही विद्यार्थी पटावर नाही. त्यामुळे या शाळा बंद करून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जवळील शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे. तर वडाळा येथील नाडकर्णी पार्क मराठी शाळा क्रमांक दोन या शाळेतही विद्यार्थी नसल्याने बंद करण्यात येणार आहे. तर शिवडी येथील शताब्दी सोहळा महापालिका मराठी शाळेत तीन विद्यार्थी असल्याने या विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना जवळील शाळेत समाविष्ट करण्यात येणार आहे.