News Flash

‘फास्टॅग’धारक वाहनचालकांना पथकरात पाच टक्के सवलत

११ जानेवारीपासून ही सवलत योजना सुरू होणार असून, ती मर्यादित कालावधीसाठी असेल.

मुंबई : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी) मार्गावर प्रवास करणाऱ्या ‘फास्टॅग’धारक वाहनचालकांना पथकरात ५ टक्के सवलत देण्याची घोषणा राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) केली आहे. ११ जानेवारीपासून ही सवलत योजना सुरू होणार असून, ती मर्यादित कालावधीसाठी असेल.

केंद्र सरकारने वाहन कायद्यात बदल केले आहेत. त्यानुसार पथकर नाक्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सर्व वाहनांना ‘फास्टॅग’ बंधनकारक  केला असून, येत्या १५ फेब्रुवारीपासून सक्ती केली जाणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राज्यभरातील पथकर नाक्यांवर ‘फास्टॅग’ प्रणालीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांची समन्वय संस्था म्हणून नियुक्ती केली आहे.

योजना काय?

’ ‘फास्टॅग’ची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून केवळ २० ते २५ टक्के वाहनधारक तिचा वापर करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. अधिकाधिक वाहनधारकांनी या प्रणालीचा वापर करावा, यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने ५ टक्के सवलतीची योजना जाहीर करण्यात आली आहे.

’ मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि वांद्रे-वरळी सागरी सेतूने प्रवास करणाऱ्यांना प्रत्येक फेरीला पथकराच्या ५ टक्के रक्कम वाहनधारकाच्या ‘फास्टॅग’ बँक खात्यात महामंडळामार्फत थेट जमा होईल.

’ मर्यादित कालावधीसाठी ही सवलत योजना लागू करण्यात आली असून, टप्प्याटप्प्याने अन्य पथकर नाक्यांवरही ती लागू केली जाईल, असे महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी सांगितले.

..येथे कार्यान्वित

यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, सातारा-कागल राष्ट्रीय महामार्ग, राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी) तसेच मुंबईच्या प्रवेशद्वारावरील वाशी, मुलुंड (पूर्व द्रुतगती मार्ग), मुलुंड (लालबहादूर शास्त्री), ऐरोली पथकर नाक्यावर ‘फास्टॅग’ प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2021 1:29 am

Web Title: five percent discount on road tax for fastags user drivers zws 70
Next Stories
1 खासगी रुग्णालयांतील अग्निसुरक्षेची तपासणी
2 गुजराती समाजाला जोडण्यासाठी शिवसेनेची वर्षभर मोहीम
3 प्राचार्याची २६० पदे भरण्यास मंजुरी
Just Now!
X