खरेदीदारांना दिलासा; वन बीएचकेकडे विकासकांचा अधिक कल
मुंबई, ठाणे तसेच नवी मुंबईतील गगनाला भिडलेल्या घरांच्या किमतीत यापुढे फक्त पाच टक्केच वाढ अपेक्षित असून घरांच्या किमती स्थिर राहतील, असा अंदाज जागतिक पातळीवरील ‘जोन्स लँग लासेले’ या कंपनीच्या संशोधन विभागाने वर्तविला आहे. पुढील १२ ते १८ महिन्यांत घरांच्या किमती वाढल्या तर त्या फक्त पाच टक्के असतील, असेही त्यांचे म्हणणे आहे. एक कोटीपेक्षा कमी किमतीची घरे अनेक विकासकांनी देऊ केल्यामुळेही घरक्रांती होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राज्य शासनाने एकीकडे शीघ्रगणकात पाच ते सात टक्के वाढ केल्यामुळे मुंबईत घर विकत घेणे अधिकच महाग झालेले असताना सर्वेक्षणाचा हा आधार इच्छुक ग्राहकांसाठी दिलासा देणारा असल्याचे बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. २०१४ च्या तुलनेत २०१५ मध्ये घरांच्या किमतीत सहा टक्के वाढ झाली. गेल्या दोन-तीन वर्षांत घरांच्या किमतीतील वाढ ही जेमतेम पाच ते आठ टक्क्यांच्या घरात आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारही घरांमधील गुंतवणूक काढून घेण्याच्या मार्गावर आहेत. याशिवाय आणखी गुंतवणूकदार इच्छुक नसल्यामुळे ग्राहकांच्या दृष्टीने पुढील काही वर्षे खरेदीसाठी चांगली असतील, असाही एक अंदाज वर्तविला जात आहे. ‘जोन्स लँग लासेले’च्या संशोधन विभागाचे प्रमुख आशुतोष लिमये यांच्या मते, येत्या एक-वन वर्षांत घरांच्या किमतीत फारशी वाढ होणार नाही; परंतु नेमक्या कुठल्या घरांची मागणी अधिक आहे, त्यानुसार बडे विकासकही घरांची निर्मिती करू लागल्यामुळे त्याचा फायदा गृहउद्योगालाही होणार आहे. आर्थिक चणचणीत असलेल्या विकासकांना त्यातून बाहेर पडण्याची संधी मिळणार आहे. २०१५ मधील गृहप्रकल्पांचा विचार केला तर विकासकांनी घरांच्या किमतीत काही प्रमाणात कपात केली आहे. ग्राहकांनी घर खरेदी करावे, अशा रीतीने विकासकांचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसते. दुसरे म्हणजे टू बीएचकेऐवजी वन बीएचके उपलब्ध करून देण्याकडे विकासकांचा कल दिसून येत आहे, ही मध्यमवर्गीय खरेदीदारांसाठी आनंदाची बाब आहे. खरे तर ही गरज आहे, असेही लिमये यांनी सांगितले. विकासकांवर विश्वास न राहिल्याने अर्धवट अवस्थेतील घरे खरेदी करण्याबाबत ग्राहक इच्छुक नाहीत. तसेच अशा प्रकल्पांमध्ये खरेदीदाराला अधिक रक्कम गुंतवावी लागत आहे. या घरांचा वेळेवर ताबा मिळेल किंवा नाही, याबाबतही तो साशंक आहे. सध्या नामांकित विकासकांच्या प्रकल्पांमध्येच ग्राहक पैसे गुंतवत असून मंदीमुळे विकासकांनीही किमती काही प्रमाणात कमी केल्याचा फायदा ते उठवत आहेत, असेही लिमये म्हणाले.

जानेवारी-डिसेंबर २०१५ मधील नव्या घरांच्या निर्मितीची (३६ हजार २९१) आकडेवारी पाहिल्यास, २०१४ च्या तुलनेत पाच टक्के तर २०१३ च्या तुलनेत ८ टक्के घरे अधिक बांधली गेली आहेत.
घरांची विक्री २०१५ मध्ये अधिक आहे. तब्बल ३२ हजार ४४३ घरे विकली गेली. २०१४ च्या तुलनेत हे प्रमाण २३ टक्क्यांनी अधिक आहे. २०१३ पेक्षा पाच टक्क्यांनी कमी आहे.
विकल्या न गेलेल्या घरांची संख्या ८० हजार ४२२ आहे. २०१४ च्या तुलनेत पाच टक्के तर २०१३ च्या तुलनेत १२ टक्के अधिक आहे.