सध्या शाळा, कॉलेजना सुट्टी असल्यामुळे वेगवेगळे ग्रुप्स, फॅमिली कुठेना कुठे पिकनिकला जाण्याचा प्लान करत असतील. ज्यांना गावी किंवा तीन-चार दिवसांसाठी थंड हवेच्या ठिकाणी जाणे शक्य नाही अशांचा वनडे पिकनिकवर भर असेल. मुंबईजवळ असलेल्या अशाच पाच वनडे पिकनिक स्पॉटची आम्ही तुम्हाला माहिती देत आहेत.

माथेरान
महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणांमध्ये माथेरानचा समावेश होते. माथेरान हे मुंबईपासून जवळ असलेले पर्यटन स्थळ आहे. माथेरानचे निसर्ग सौंदर्य, जंगल नेहमीच इथे येणाऱ्या पर्यटकांना भुरळ घालते. समुद्रसपाटीपासून २६२५ फूट उंचीवर असलेल्या माथेरानमध्ये वेगवेगळे पॉईंटस आहेत.

माथेरान मुंबईपासून १०० तर पुण्यापासून १२० किलोमीटर अंतरावर आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटीहून तुम्ही ट्रेन पकडल्यानंतर दीड ते दोन तासात नेरळला पोहोचता.

नेरळला स्टेशनला उतरल्यानंतर तिथून तुम्ही टॅक्सीने किंवा टॉय ट्रेनने माथेरानच्या पायथ्याशी जाऊ शकता. टॅक्सीने हा प्रवास २० ते २५ मिनिटांचा आहे तर टॉय ट्रेन दोन ते तीन तास लागतात. माथेरानमध्ये वाहनांना परवानगी नाहीय. त्यामुळे दस्तुरी कार पॉईंटपर्यंत तुम्ही वाहन नेऊ शकता. तिथून मातीच्या रस्त्यावरुनच माथेरानची भ्रमंती करावी लागते. वयोवुद्ध व्यक्तिंसाठी इथे घोडयांची व्यवस्था आहे. इथली शांतता आणि गर्दी वनराईच्या प्रेमात पडल्याशिवाय तुम्ही राहणार नाही.

एलिफंटा
एलिफंटा लेणी मुंबईपासून १० किलोमीटर अंतरावर आहेत. घारापुरी बेटावर ही लेणी असून फक्त बोटीनेच इथे पोहोचता येते. गेट वे ऑफ इंडियावरुन बोट पकडल्यानंतर एलिफंटाला पोहोचायला तासाभराचा वेळ लागतो. प्राचीन काळातील ही लेणी पाहताना तुम्हाला एक वेगळा आनंद मिळतो. मुंबई फिरायला परदेशी पर्यटक हमखास या लेण्यांना भेट देऊन भारताची संस्कृती समजून घेण्याचा प्रयत्न करतात. संध्याकाळी पाचवाजेपर्यंत इथे जाण्यासाठी लाँचची व्यवस्था आहे. युनेस्कोने १९८७ साली एलिफंटाला जागतिक वारसा स्थानाचा दर्जा दिला.

 

कर्नाळा
कर्नाळा हे महाराष्ट्रातील पक्षी अभयारण्य आहे. कोकण मार्गावर असलेले कर्नाळा अभयारण्य पक्षीप्रेमींचे आवडते ठिकाण असून पनवेलपासून १२ किलोमीटर अंतरावर आहे. रस्ते मार्गाने इथे पोहोचणे जास्त उपयुक्त ठरते. विविध पक्ष्यांच्या प्रजाती, निसर्गसौंदर्य कर्नाळयाचे वैशिष्टय असून कर्नाळा किल्ल्यावर तुम्ही भ्रमंती करु शकता. अनेकजण खास गिर्यारोहण्याचा अनुभव घेण्यासाठीही कर्नाळयाला येतात.

 

येऊर
येऊन ठाणे जिल्ह्यात असून मुंबईपासून फक्त २५ किलोमीटर अंतरावर आहे. पक्षी निरीक्षण आणि जंगल भ्रमंतीची आवड असलेल्या अनेकांची येऊरला पसंती असते. फक्त तास-दीडतासात तुम्ही येऊरला पोहोचू शकता. छोटया-छोटया टेकडया आणि जंगलामुळे इथे भटकंती करताना एक वेगळा आनंद मिळतो. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा ४० किलोमीटरचा भाग येऊरमध्ये मोडतो. विविध प्रकारच्या वनस्पती, प्राणी, पक्ष्यांनी हे जंगल समृद्ध आहे.

गोराई
गोराई समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध असून मुंबईच्या उत्तरेला वसलेले एक सुंदर पर्यटनस्थळ आहे. बोरीवली व भाईंदरवरुन तुम्ही इथे सहज पोहोचू शकता. पश्चिम रेल्वे मार्गावरुन बोरीवलीच्या दिशेने जाणारी कोणतीही ट्रेन पकडा. प्रत्येक फास्ट ट्रेन बोरीवलीमध्ये थांबा घेते. बोरीवली स्थानकात उतरल्यानंतर तुम्ही बस किंवा रिक्षाने गोराईला पोहोचा. तिथून लाँचने तुम्हाला गोराई किनाऱ्यावर जाता येते. गोराईमध्ये रिसॉटर्स आणि राहण्याची व्यवस्था आहे. इथल्या किनाऱ्यावर फिरताना मनाला एक वेगळीच शांतता, प्रसन्नता मिळते.