केंद्रीय गृहमंत्रालयाने उत्कृष्ट तपासकार्यासाठी देशातील ९६ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘विशेष पोलीस पदक’ जाहीर केले असून यामध्ये राज्यातील ११ पोलीसांचा समावेश आहे.

पोलिसांमध्ये तपास कार्याबद्दल उच्च व्यावसायीक दृष्टीकोन निर्माण व्हावा तसेच उत्तम तपासकार्य करणाऱ्या पोलिसांच्या कार्याची दखल म्हणून केंद्रीय गृहमंत्रालयाने गेल्यावर्षीपासून उत्कृष्ट तपासकार्यासाठी ‘विशेष पोलीस पदक’ पुरस्कार सुरु केला आहे. यावर्षी उत्कृष्ट तपासकार्यासाठी देशभरातील ९६ पोलीस अधिकारी आणि कर्मचा-यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ११ पोलिसांसह राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए), केंद्रीय अन्वेशन ब्युरो (सीबीआय) आणि अंमलीपदार्थ नियंत्रण विभागातील (एनसीबी) पोलीस कर्मचा-यांचा समावेश आहे.

राज्यातील ‘विशेष पोलीस पदक’ विजेत्यांची नावे

राज्यातील ११ पोलीस अधिका-यांना विशेष पोलीस पदक जाहीर झाले आहे. यात, पोलीस उपअधिक्षक प्रशांत अमृतकर, पोलीस निरीक्षक सर्वश्री अविनाश आघाव, सुरेश रोकडे, प्रदीप भानुशाली, हेमंत पाटील, सागर शिवलकर, संजय निकुंबे, सुधाकर देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन माने यांच्यासह श्रध्दा वायदांडे आणि प्रियंका शेळके या महिला सहायक पोलीस निरीक्षकांचाही समावेश आहे.