रेल्वे प्रवाशांची रांगेतील प्रतीक्षा संपणार

मुंबई : रेल्वे स्थानकाबाहेर पडणाऱ्या प्रवाशांना त्वरीत टॅक्सी मिळावी, यासाठी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबाहेर सुरू करण्यात आलेली अ‍ॅपआधारित टॅक्सीसेवा आता आणखी पाच रेल्वे स्थानकांच्या परिसरात सुरू होणार आहे.  लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) हद्दीत एका आठवडय़ात सेवा उपलब्ध होईल. उर्वरित चार स्थानकांसाठी निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

रेल्वे स्थानकाबाहेर येताच प्रवासी काळ्या-पिवळ्या रिक्षा, टॅक्सीचा आधार घेतात. मात्र त्यासाठी रांगेत उभे राहावे लागत असल्याने प्रवाशांचा बराच वेळ जातो. मेल-एक्स्प्रेसमधून उतरलेले प्रवासी सामानासह स्थानकाबाहेर येताच त्यांना रिक्षा-टॅक्सींच्या रांगेत उभे राहणेही कठीण जाते. त्यामुळे अ‍ॅपआधारित टॅक्सींचा आधार ते घेतात. परंतु रिक्षा-टॅक्सीचालकांकडून त्याला विरोध केला जातो आणि आरक्षित केलेली अ‍ॅपआधारित टॅक्सी प्रवाशांना काही अंतरावर जाऊन पकडावी लागते. त्यामुळे या प्रवाशांची मोठी अडचण होते. या पाश्र्वभूमीवर रेल्वे प्रवाशांना अ‍ॅपआधारित टॅक्सी सेवा त्वरित उपलब्ध करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. यामध्ये विमानतळाप्रमाणेच रेल्वे स्थानकाबाहेर टॅक्सी आरक्षित करण्यासाठी केंद्र उभारले जाणार आहे. तर टॅक्सी आरक्षित करताच स्थानकाबाहेरच त्याची सेवा त्वरित उपलब्ध होणार आहे.

सीएसएमटी स्थानकात मेरू कॅब सेवा नुकतीच सुरू करण्यात आली. आता आणखी पाच स्थानकांत ही सुविधा देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. यात लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकात एका आठवडय़ात ओला टॅक्सीची सेवा मिळेल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तर पनवेल स्थानकासाठी निविदा काढली असून ठाणे, कल्याण, दादर स्थानकांसाठीही लवकरच प्रक्रिया केली जाणार असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.