मुंबई : ‘काँग्रेसमुक्त  महाराष्ट्र’ हे उद्दिष्ट स्पष्ट करतानाच काँग्रेसचे आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, असे सूतोवाच भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले असले तरी काँग्रेसचे पाच ते सहा आमदार आधीपासूनच भाजपच्या संपर्कात आहेत. यापेक्षा जास्त आमदार पक्षांतर करणार नाहीत, असा काँग्रेसमध्ये मतप्रवाह आहे.

काँग्रेसच्या कार्याध्यक्षांसह काही आमदार भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, असे चंद्रकांत पाटील यांनी पदभार स्वीकारताना सांगितले होते. भाजपच्या या दाव्यामुळे काँग्रेसच्या गोटात काहीसे संशयाचे वातावरण आहे. परंतु पाच ते सहा आमदार कधीही भाजपमध्ये प्रवेश करू शकतात याची काँग्रेस नेतृत्वाला पूर्वकल्पना आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे दोन समर्थक आमदार गेले वर्षभर आमदारकी वाचविण्यासाठी काँग्रेसबरोबर असले तरी मनाने ते कधीच काँग्रेसबरोबर नाहीत.  राणे समर्थक नितेश राणे आणि कालिदास कोळंबकर या दोन आमदारांनी लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाच्या उमेदवारांचे उघडपणे काम केले आहे. या दोन आमदारांना पक्षानेही गृहीत धरलेले नाही.

पश्चिम महाराष्ट्रातील एक आमदार आधीपासूनच मनाने भाजपबरोबर आहे. बाजार समितीचे सभापतीपद या आमदाराने भाजपकडे जाईल, अशी व्यवस्था केली होती. हा आमदार भाजपमध्ये जाणार हे काँग्रेसला अपेक्षित आहे. विदर्भातील एक किंवा दोन आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत. पाच ते सहा आमदारांपेक्षा जास्त आमदार काँग्रेस सोडणार नाहीत, असा पक्षात मतप्रवाह आहे.

पदभार स्वीकारल्यावर नवे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे पक्षाच्या आमदारांशी स्वतंत्रपणे भेटी घेऊन चर्चा करणार आहेत. पक्षाच्या आमदारांमध्ये विश्वासाचे वातावरण तयार करण्यावर पक्षाने भर दिला आहे.

आमदार फुटणार अशी भाजपने आवई उठविली असली तरी काँग्रेसमध्ये अजिबात फूट पडणार नाही. काही जण आधीपासूनच वेगळी भूमिका घेऊन आहेत.

– बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष