वांद्रे स्थानकात गुरुवारी संध्याकाळी एका महिलेचा लोकलखाली आल्यानं मृत्यू झाला होता. तब्बल १७ तासानंतर पोलिसांना महिलेच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात यश मिळालं. महिलेचा पाच वर्षाचा मुलगाही अपघातात जखमी झाला होता. आश्चर्यकारकरित्या या अपघातातून तो बचावला होता. उपचारादरम्यान चिमुरडा बोरिवली…बोरिवली असं ओरडू लागला आणि पोलिसांना ओळख पटवण्यात मदत झाली. त्याची दोन वर्षांची बहिण गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. अद्याप ती बेशुद्ध अवस्थेत आहे.

वांद्रे पोलिसांनी महिलेची ओळख पटवली असून प्रिती गुप्ता असं तिचं नाव आहे. गुरुवारी प्रिती आपला पाच वर्षांचा मुलगा आर्यन आणि मुलगी आराधनासोबत लोकलने बोरिवलीहून निघाली होती. रात्री दिड वाजल्यानंतरही पत्नी घरी आली नाही, तेव्हा पती राजेशने पोलिसांत धाव घेत तक्रार नोंद केली. राजेश दुकान चालवतो.

अपघातानंतर बेशुद्ध अवस्थेत असणारा चिमुरडा जेव्हा शुद्धीत आला तेव्हा पोलिसांनी कुठे राहतो असं विचारलं. त्याला जास्त बोलता येत नव्हतं पण तो बोरिवली असं म्हणत होता. ‘आम्ही तात्काळ बोरिवली पोलिसांशी संपर्क साधला. तेव्हा आम्हाल कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात एक महिला बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद झाल्याची माहिती मिळाली. तक्रारीतील माहिती महिलेशी जुळणारी होती’, अशी माहिती वांद्रे जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलकुमार जाधव यांनी दिली आहे.

प्रिती न सांगताच दोन्ही मुलांसोबत घराबाहेर पडली होती अशी माहिती राजेशने तक्रारीत दिली आहे. गुरुवारी रात्री वांद्रे फलाट क्रमांक ४ आणि ५ दरम्यान प्रितीचा मृतदेह आढळला होता. लोकांनी माहिती दिल्यानंतर तिला भाभा रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. दोन्ही मुलांवर उपचार सुरु असून महिला पोलीस कॉन्स्टेबल त्यांची काळजी घेत आहेत.

दरम्यान हा अपघात आहे की आत्महत्या याचा पोलीस तपास करत आहेत. रेल्वे रुळ ओलांडताना अपघात झाला असल्याचाही पोलिसांना संशय आहे.