इतर प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचे निष्पन्न झाल्यास कारवाई

मुंबई : उपनगरी प्रवासात स्टंट करणाऱ्यांना पाच वर्षांची शिक्षा भोगावी लागेल, अशी घोषणा मध्य रेल्वे सुरक्षा दलाने केली आहे. स्टंटबाजांमुळे प्रवासादरम्यान इतर प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याचे निदर्शनास आल्यास पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद असलेल्या नवीन कलमानुसार सुरक्षा दलाकडून ही कारवाई केली जाणार आहे.

उपनगरी प्रवासात गटागटाने प्रवास करणाऱ्यांकडून हुल्लडबाजी केली जाते. यात मोठय़ा प्रमाणात तरुणांचाच समावेश असतो.

गाडीच्या दरवाजाजवळ उभे राहून स्टंट करताना दुसऱ्या गाडीच्या खांबांना हात लावणे, फलाटावरील प्रवाशाला हाताने मारणे, फलाटावर पाय घासून जाताना पायानेच अन्य प्रवाशाला स्पर्श करणे, गाडीचा दरवाजा ते खिडकी आणि पुन्हा दरवाजा असा स्टंट करणे किंवा गाडीच्या छतावर उभे राहणे इत्यादी स्टंटचे प्रकार केले जातात. यामुळे गाडीच्या दरवाजाजवळील किंवा फलाटावरील प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होतो.

अशा स्टंटबाजांना चपराक लगावण्यासाठी मध्य रेल्वे सुरक्षा दलाने कलम १५३ची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या जीविताला हेतुपुरस्सर धोका निर्माण करणाऱ्या स्टंटबाजावर या कलमानुसार कारवाई करण्यात येणार असून त्यात तो दोषी ठरल्यास त्याला पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे, असे मध्य रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त के. के. अशरफ यांनी सांगितले.  स्टंट करणाऱ्या व्यक्तीला सध्या केवळ दंड आकारण्याची किंवा एक ते तीन महिन्यांपर्यंत शिक्षा भोगण्याची तरतूद आहे. यामुळे स्टंटबाजांवर वचक बसेल आणि इतर प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

कारवाई अशी..

* स्टंट करताना अन्य प्रवाशांच्या जीविताला धोका होत असल्याचे निदर्शनास आले तरच या नवीन कलमाचा वापर.

* जानेवारी ते ऑगस्ट २०१९ पर्यंत मध्य रेल्वे मुंबई विभागात उपनगरी प्रवासात स्टंट करणाऱ्या ३३९ जणांना पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून १ लाख २८ हजारांचा दंड वसूल केला असून एकाला तुरुंगवास भोगावा लागला आहे.

* हार्बरवर वडाळा, जीटीबी नगर ते चुनाभट्टी, चेंबूर, गोवंडी, वाशी, तर मुख्य मार्गावर कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, दिवा, कांजुरमार्ग, भांडुप, मुलुंड, ठाणे स्थानकातून उपनगरी प्रवास करणाऱ्यांमध्ये स्टंटबाजही असतात.