मुंबईतील कर्करोग रुग्णांची संख्या वाढत असून त्यासाठी तातडीने रुग्णालय आवश्यक असल्याचे पालिका सांगत असतानाच रे रोड येथील पहिल्या कर्करोग रुग्णालयासाठी किमान पाच वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. खाजगी सहभागातून उभ्या राहणार असलेल्या या रुग्णालयासाठी पालिकेने दुसऱ्यांदा काढलेल्या निविदेला केवळ  एक प्रतिसाद आला असून त्याला मंजुरी देण्याचा प्रस्ताव सोमवारी सुधार समितीत येणार आहे. मात्र हा प्रस्ताव जशाच्या तशा मंजूर झाला तरी हे रुग्णालय उभे राहण्यासाठी आणखी पाच वर्षांचा कालावधी लागेल.
रे रोड येथील अहिल्याबाई होळकर प्रसुतीगृहाची १००८ चौरस मीटर जागेवर सध्या सहा मजली इमारत उभी असून विकास नियंत्रण नियमावलीनुसार ५.२ चटई क्षेत्र निर्देशांक उपलब्ध होऊ शकतो. पालिकेच्या रुग्णालयाबाबतच्या अटीशर्तीनुसार २० टक्के खाटा गरीब रुग्णांना मिळणार असून उर्वरित ८० टक्के खाटांना या टाटा स्मारक रुग्णालयाच्या अर्ध खाजगी व खाजगी विभागात लागू असलेले दर आकारण्याची मुभा देण्यात आली आहे. पालिकेच्या निविदेला प्रिन्स अली खान रुग्णालयात कर्करोग विभाग सुरू करणाऱ्या डॉ. सुलतान प्रधान प्रमुख विश्वस्त असलेल्या कॅनकेअर ट्रस्टने प्रतिसाद दिला आहे. इमारत बांधकाम सुरू करण्याचा दाखला मिळाल्यानंतर पावसाळ्याचे महिने वगळता ३६ महिन्यांमध्ये रुग्णालय बांधायचे आहे. पालिकेकडून आराखडे मंजूर होण्यास, इतर परवानगी देण्यास विलंब झाल्यास त्याचाही कालावधी वाढवून देण्यात येणार आहे, असे पालिकेच्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील किमान पाच वर्षे तरी रुग्णालयाचे बांधकाम सुरू राहणार असल्याचा अंदाज आहे.
कर्करोगावरील उपचारांसाठी रुग्णालय बांधण्यासाठी रे रोड येथील अहिल्याबाई प्रसुतीगृहाचे आरक्षण बदलण्याचा तसेच निविदाकाराला मान्यता देण्यासाठीचा प्रस्तावावर सदस्यांची मते घेऊन निर्णय घेतला जाईल, असे सुधार समितीचे अध्यक्ष राम बारोट म्हणाले.