पाचव्या वर्षांनिमित्ताने राज्यातील ५१ संस्थांच्या प्रतिनिधींचा स्नेहमेळावा
समाजात सगळाच अंधार आहे असे नाही. आजूबाजूच्या काळोखाला छेद देणाऱ्या पणत्या इथे-तिथे तेवतच असतात. गरज असते ती त्यांच्या त्या मंद प्रकाशाला हात देण्याची, तो प्रकाश सर्वत्र पोहोचविण्याची. ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमातून गणेशोत्सवाच्या मंगलपर्वादरम्यान अशा प्रकाशज्योतींचा परिचय करून देण्यात येतो. त्यांच्या कार्याला उभारी मिळावी म्हणून लक्षावधी वाचकांच्या साहय़ाने दानयज्ञ भरविण्यात येतो. यंदाचे या उपक्रमाचे पाचवे वर्ष. या कालावधीमध्ये समाजातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या अशा ५१ सामाजिक संस्था आणि समाजात सकारात्मक काही घडते त्यात आपलाही वाटा असावा असे वाटणारे लक्षावधी वाचक यांच्यात दानरूपी सेतू उभारण्याचे काम ‘लोकसत्ता’ने केले आहे.
यंदा या उपक्रमाच्या पाचव्या वर्षांच्या निमित्ताने या सर्व संस्थांच्या स्नेहमीलनाचा तसेच या वर्षी प्रसिद्ध करण्यात आलेल्या संस्थांना मिळालेल्या धनादेशाच्या वितरणाचा सोहळा येत्या मंगळवारी, २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. दादरच्या सावरकर सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमास आपल्या सामाजिक जाणिवेसाठी ओळखले जाणारे सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते धनादेशांचे वाटप करण्यात येणार आहे. या वेळी ‘लोकसत्ता ग्रंथमाले’तील ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. –