हिवाळ्यात मुंबईच्या खाडी किनारी स्थलांतर करून पावसाळा सुरू होण्यापूर्वी पुन्हा आपल्या मायदेशी परतणारे रोहित (फ्लेमिंगो) पक्षी यंदा ऑगस्ट महिन्यातही मुंबईत तळ ठोकून आहेत. गोराई, मालाड  खाडीकिनारी यापूर्वी कधीही स्थलांतर न केलेल्या या पक्ष्यांनी यंदा मात्र तेथे आपले बस्तान बसविले आहे. एकूणच शिवडी-उरणसारख्या महत्त्वाच्या खाडी क्षेत्रात सुरू झालेल्या विकास प्रकल्पांच्या बांधकामांचा परिणाम या पक्ष्यांच्या स्थलांतरणाच्या पट्टय़ावर झाल्याचे चित्र दिसत आहे.

दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात स्थलांतर करून शिवडी, माहुल, ठाणे खाडी, भांडुप उदंचन केंद्र याठिकाणी फेल्मिंगो पक्षी डेरेदाखल होतात. साधारण सहा ते सात महिने या ठिकाणी वास्तव्य करून विणीच्या हंगामासाठी हे पक्षी पुन्हा आपल्या मायदेशी परतात. यंदा मात्र अशी परिस्थिती नसून गेल्या दहा दिवसांपासून गोराईसह मालाडच्या खाडी क्षेत्रात हजारोंच्या संख्येने फ्लेमिंगो पक्षी उतरले आहेत. यापूर्वी कधीही भेट न दिलेल्या या पाहुण्यांच्या आगमनाने स्थानिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. गेल्या चाळीस ते पन्नास वर्षांपासून फ्लेमिंगो पक्ष्यांना गोराई खाडीत विहार करतान न पाहिल्याची माहिती बोरिवली-गोराई फेरीचे व्यवस्थापक कॅश्यू यांनी दिली. प्रथमच हे पक्षी गोराई खाडीत उतरले असून गेल्या पंधरा दिवसांपासून या ठिकाणी त्यांचे वास्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईच्या खाडीलगत असणारा दलदलीचा परिसर हा स्थलांतरित पक्ष्यांना पोषक खाद्य पुरविण्याकरिता समृद्ध आहे. दलदलीच्या परिसरात लहान मासे, नील आणि हरित शैवाळ, जलकीटकांच्या अळ्या, एकपेशी वनस्पती हे खाद्य विपुल प्रमाणात मिळत असल्याने स्थलांतरित पक्ष्यांसोबत फ्लेमिंगो पक्षी या ठिकाणी स्थलांतर करतात.

‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’तर्फे सुरू असणाऱ्या ‘बर्ड रिंिगग’ प्रकल्पाद्वारे इराणमध्ये रिंग केलेले फ्लेमिंगो मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागात येत असल्याचे निरीक्षण संशोधकांनी टिपले आहे. इराणमधील पाणथळ नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने त्यांनी भारतामध्ये पर्यायाने महाराष्ट्रामध्येच प्रजननाच्या जागा शोधण्याची सुरुवात केल्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये दाखल होणारे हे पक्षी गुजरातच्या कच्छबरोबरच इराणसारख्या दूरदेशातूनही येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र आपल्या विहित स्थलांतराच्या कालावधीव्यतिरिक्त अधिक काळ हे पक्षी मुंबईत वास्तव्यास असल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबईत दाखल होणारे सर्वच फ्लेमिंगो विणीच्या हंगामासाठी पुन्हा आपल्या मायदेशी परतत नाहीत. लहान आणि प्रजनन करण्याची क्षमता नसणारे अनेक फ्लेमिंगो स्थलांतर न करता याच ठिकाणी खाडी क्षेत्रात विहार करत असल्याची माहिती पक्षीअभ्यासक अविनाश भगत यांनी दिली. त्यामुळे सध्या गोराई आणि मालाड या ठिकाणी दिसणारे फ्लेमिंगो हे पुन्हा मायदेशात न परतलेले पक्ष्यांपैकी असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. तर शिवडीसारख्या महत्त्वाच्या खाडी क्षेत्रात ट्रान्स हार्बर लिंकच्या कामामुळे फ्लेमिंगोचा अधिवास नष्ट झाल्याने पर्यायी जागा म्हणून गोराई आणि मालाड खाडीत हे पक्षी उतरल्याचा अंदाज पक्षीनिरीक्षक विजय अवसरे यांनी व्यक्त केला. हुण्या फ्लेमिंगोंचे मुंबईत बस्तान; गोराई खाडीत दर्शन