News Flash

कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत याकुब मेमनचा मुंबईत दफनविधी

मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी याकुब मेमनवर गुरुवारी संध्याकाळी मुंबईत दफनविधी करण्यात आले.

| July 30, 2015 07:56 am

मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी याकुब मेमनवर गुरुवारी संध्याकाळी मुंबईत दफनविधी करण्यात आले. यावेळी त्याचे भाऊ उस्मान आणि सुलेमान यांच्यासह इतर नातेवाईक उपस्थित होते. अंत्यविधीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.
फाशी दिल्यानंतर नागपूरमधील कारागृह अधीक्षकांनी त्याचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्याच्या नातेवाईकांकडे दिल्यावर तो विमानाने मुंबईला आणण्यात आला. त्यानंतर माहिममधील त्याच्या निवासस्थानी काही वेळासाठी तो ठेवण्यात आला. त्यानंतर मरिन लाईन्समधील बडा कब्रस्तानमध्ये दफनविधी करण्यात आले. दफनविधीच्या पार्श्वभूमीवर माहिम परिसरात कडेकोट पोलीस सुरक्षा तैनात करण्यात आली होती. शीघ्र कृती दलाची तुकडीही तिथे तैनात करण्यात आली होती. पोलीसांनी मुंबईमध्ये जमावबंदीचे आदेश लागू केले असून, याकुबची अंत्ययात्रा काढण्याला परवानगी नाकारली.
याकुबचा मृतदेह असलेले विमान गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास नागपूरहून रवाना झाले. राज्याचे अतिरिक्त गृह सचिव के. पी. बक्षी यांनी दिलेल्या माहितीनुसार, याकुबला गुरुवारी सकाळी फाशी देण्यात आली. त्यानंतर सातच्या सुमारास कारागृह अधीक्षकांनी त्यांना याबद्दल माहिती दिली. शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पडल्यानंतर याकुबचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांकडे देण्यात आला. सकाळी आठ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास याकुबचे दोन बंधू उस्मान आणि सुलेमान कारागृहात दाखल झाले. त्यानंतर त्यांच्याकडून मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली गेली.
याकुबचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात द्यायचा की नाही, यावर अंतिम क्षणापर्यंत स्पष्टता नव्हती. अखेर परिस्थितीचा आढाव घेऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे आयुक्त देवेन भारती आणि मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया बुधवारपासूनच स्वत: शहरभरातील सुरक्षेचा आढाव घेत आहेत. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संबंधित नेत्यांना भेटून त्यांना शांतता राखण्याचे आव्हान करण्यात आले आहे. माहिममधील मेमन कुटुंबिय वास्तव्याला असणाऱ्या निवासस्थानाबाहेरही पोलिसांचा पहारा आहे. बुधवारी रात्रीपासूनच मुंबईत संवेदनशील ठिकाणी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मुंबईत सुरक्षेच्या कारणास्तव एकूण ४०५ जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2015 7:56 am

Web Title: flight carrying yakub memons body arrives in mumbai
टॅग : Yakub Memon
Next Stories
1 प्रत्येक विभागात १० कामे करण्याचे बंधन
2 औषधांची जेनेरिक नावे सुवाच्च अक्षरातच हवी
3 शोभा डे हक्कभंग प्रकरण : विधिमंडळ, न्याययंत्रणेत ‘अधिकारवाद’
Just Now!
X