ऑनलाईन खरेदीसाठी देशभर प्रसिद्ध असलेल्या फ्लिपकार्ट आणि मंत्रा या ऑनलाईन पोर्टलचे पुरवठा कर्मचारी वेतनवाढ आणि कामाची वेळ निश्चित करण्याच्या मागणीसाठी संपावर गेले आहेत.
ग्राहकांनी ऑनलाईन खरेदी केलेले साहित्य घरोघर पोहोचविण्याचे काम करणारे ‘डिलिव्हरी बॉईज’, साहित्य वेगळे करणारे कर्मचारी यांनी कामकाज थांबविल्यामुळे मुंबईतील ग्राहकांनी ऑनलाईन केलेली खरेदी रखडणार आहे. संपावर गेलेले कर्मचारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र कामगार सेनेशी संलग्न आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी ४ ऑगस्ट रोजी ऑनलाईन विक्रेत्यांची भेट घेणार आहेत. ‘डिलिव्हरी बॉईज’ने फोर्ट, लोअर परेल आणि ताडदेव येथील फ्लिपकार्टचे साहित्य घेणे बंद केले. तर २८ जुलैपासून अंधेरी एमआयडीसी मधील फ्लिपकार्ट आणि विक्रोळीतील मंत्राचे साहित्य उचलण्यात आलेले नाही.
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना सचिव सचिन गोळे म्हणाले की, ऑनलाईन विक्रेत्यांनी कामगार कायद्याचे पालन करून सर्व कर्मचाऱ्यांना विमा योजना लागू करावी अशी आमची आग्रही मागणी आहे. या कर्मचाऱ्यांना व्यवस्थित शौचालयांचीही व्यवस्था देण्यात आली नसून केलेल्या अतिरिक्त कामाचा मोबदलाही दिला जात नाही. प्रत्येक वस्तू घरपोच करण्यासाठी देण्यात येणारा मोबदला केवळ तीन रुपये असून यामध्ये वडापाव खरेदी करणेही अशक्य आहे असे त्यांचे म्हणणे आहे.