अगदी शेवटच्या टप्प्यातील ग्राहकांपर्यंत पोहचता यावे, यासाठी ‘लास्ट माईल डिलिव्हीर टू कस्टमर्स’ या संकल्पनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या सेवेसाठी फ्लिपकार्ट या कंपनीने मुंबईभर प्रभावी जाळे असणाऱ्या डब्बेवाल्यांशी करार केला आहे.
ई-कार्ट आणि डब्बेवाला संघटना यांच्यात झालेल्या या कराराअंतर्गत आगामी काळात ग्राहकांपर्यंत डब्बे पोहचवतानाच डब्बेवाले त्यांना नेमून दिलेल्या फ्लिपकार्ट केंद्रातून वस्तू घेतील आणि त्या ग्राहकांपर्यंत पोहचवतील. सुरूवातीला प्रायोगिक तत्वावर डब्बेवाले आगाऊ रक्कम घेतलेल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहचवतील. भविष्यात कॅश ऑन डिलिव्हरी या प्रकारातील वस्तू पोहचविण्यासाठी डब्बेवाल्यांची मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी सध्या डब्बेवालांच्या पहिल्या तुकडीला फ्लिपकार्टच्या केंद्रावर प्रशिक्षण दिले जात आहे. दरम्यान, एखादी वस्तू ग्राहकांपर्यंत पोहचवल्यानंतर त्याची व्यवस्थित नोंद ठेवता यावी, यासाठी सुरूवातीला लेखी पद्धतीनेच कारभार केला जाणार आहे. मात्र, हळुहळु डब्बेवाल्यांना अॅप्लिकेशन्स आणि तंत्रज्ञान वापरण्याचे प्रशिक्षण देऊन ही सुविधा हायटेक करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.
गेली १२० वर्षे मुंबईकरांचे डबे अचूक ठिकाणी पोहचवण्याचे काम डब्बेवाले करत आहेत. कोणतीही ठोस प्रशासकीय व्यवस्था आणि कोणताही लेखी व्यवहार नसताना डब्बेवाले अचूक काम करतात. गुंतवणूक आणि खर्च कमी असूनही ही प्रभावीपणे व्यवस्था राबविण्याचे कसब डब्बेवाल्यांकडे आहे. या क्षेत्रातील नवे मार्ग आणि नव्या संधी शोधण्यासाठी मॅनेजमेंट गुरू म्हणून संबोधल्या जाणाऱ्या डब्बेवाल्यांशी हा करार करण्यात आल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले.