निळाशार समुद्र.. आजूबाजूला विस्तारलेली मुंबई.. रात्रीच्या अंधारात लखलखता वांद्रे-वरळी सागरी सेतू..जोडीला गार वारे.. अशा या धुंद करणाऱ्या वातावरणात मनपसंत खाद्यपदार्थावर ताव मारता आला तर..? होय, हे सुख अनुभवता येणार आहे. मुंबईतल्या पहिल्यावहिल्या ‘फ्लोटेल’वर! मुंबईच्या समुद्रात पहिल्यांदाच तरंगते हॉटेल ही संकल्पना प्रत्यक्षात आली असून वांद्रे जेट्टी येथे त्याचे बुधवारी पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन समारंभाला राज्याचे मुख्य सचिव जे. एस. सहारिया, अतिरिक्त मुख्य सचिव सुमित मलिक, एमटीडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक सतीश सोनीही उपस्थित होते.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने डब्ल्यू बी. इंटरनॅशनल कन्सल्टंट्स व एबी हॉस्पिटॅलिटी यांच्या सहकार्याने या फ्लोटेलची उभारणी केली आहे. वांद्रे-वरळी सागरीसेतूला लागूनच असलेल्या महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या जेटीवर हे तरंगते हॉटेल उभे राहिले आहे. पर्यटनाच्या दृष्टीने आगळीवेगळी संकल्पना असलेल्या या तरंगत्या हॉटेलचे उद्घाटन एवढय़ा घाईने करण्यात आले असले तरी त्यातील सोयीसुविधा अजून पूर्ण व्हायच्या आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात लोकांना या फ्लोटेलची गंमत अनुभवण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत वाट पहावी लागणार आहे. तरंगत्या हॉटेलची कल्पनाच अभिनव असल्याने स्थानिकांबरोबरच विदेशी पर्यटकांसाठीही हे मोठे आकर्षण ठरेल, असे भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

फ्लोटेलची वैशिष्टय़े
त्रिस्तरीय फ्लोटेल
स्काय डेक, दोन गॅलरी
 दोन रेस्टॉरंट्स
६६० जणांना सामावून घेण्याची क्षमता